आ.चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकार्यांची भेट
पुरग्रस्तांना ‘विशेष पॅकेज’द्या मागणीसाठी जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी शिष्टमंडळाची चर्चा
नांदेड-जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीसदृष्य मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. नदीकाठच्या शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासनाकडून नुकसानभरपाई देताना सरसकट न देता नदीकाठच्या नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज जाहिर करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांची भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले.
नांदेड जिल्ह्यात दोन वेळा ढगफुटीसदृष्य मुसधार पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांच्या जमीनीचे व पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा घातल्याने गावं पाण्याखील गेली. लोकांच्या घरातील जीवनआवश्यक वस्तुसह धान्य भिजून गेले. शेतकर्यांचे जनावनरे पुराच्या पाण्यात वाहून गेली. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जनावरांचे मृत्यदेह अद्याप सापडले नाहीत. त्यामुळे ज्या शेतकर्यांचे जनावरे वाहून गेली आहेत. त्यांनाही नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची तरतूद आहे. वाहून गेलेल्या जनावरांना आर्थिक तरतूद नाही. त्यामुळे नदीकाठच्या जमीनी व गावांतील झालेल्या नुकसानासाठी विशेष पॅकेज जाहिर करुन तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे केली.
जिल्हा राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषीमंत्री दत्तामामा भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री, महसूलमंत्री बावनकुळे यांची भेट घेवून नांदेड जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मतदीसाठी राज्य शासनाने कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेडसाठी विशेष पॅकेज जाहिर करण्याची विनंती केली आहे.
जिल्ह्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माधवराव पावडे आदिंनी आपआपल्या विभागातील पुरग्रस्त भागांची पाहणी करुन शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ परिस्थिती जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या समोर मांडली. आपल्या वतीने शासनाला नांदेड जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज जाहिर करण्याची शिफारस करण्यात यावी अशी मागणी केली.
अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली. रस्ते वाहून गेले, पुल तुटली. गावतलाव फुटले, विद्युत खांबे कोसळली. विद्युत पुरवठा अखंडीत झाला. या सर्व बाबींचा विचार करुन जिल्हा प्रशासनाच्यावतीने तातडीने पुरग्रस्त भागातील जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी बैठकीदरम्यान चर्चेत करण्यात आली आहे.
जिल्हा राष्ट्रवादीचे नेते आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांना भेटलेल्या जिल्हा राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगांवकर, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, प्रदेशचे उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माधवराव पावडे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष स्वप्नील इंगळे, मोहसिखान पठाण, बालाजीराव शिंदे आदिंचा समावेश होता.











