Home / महानगरपालिका / पालिका दवाखान्यांच्या अडचणी सोडवून उपाययोजना करण्याचे सभापती गाडीवाले यांचे निर्देश

पालिका दवाखान्यांच्या अडचणी सोडवून उपाययोजना करण्याचे सभापती गाडीवाले यांचे निर्देश

पालिका दवाखान्यांच्या अडचणी सोडवून उपाययोजना करण्याचे सभापती गाडीवाले यांचे निर्देश

नांदेड,दि.१७ जुलै
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी शुक्रवार दि.१७.०७.२०२६ रोजी महापालिकेच्या आरोग्य विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहरातील पालिका दवाखान्यांची सद्यस्थिती, तेथील अडचणी आणि नागरिकांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

स्थायी समिती सभापतींनी बैठकीच्या सुरुवातीलाच शहरातील विविध भागांतील पालिका दवाखान्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. दवाखान्यांमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या, उपलब्ध औषधसाठा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती यावर सखोल चर्चा झाली. अनेक दवाखान्यांमध्ये पायाभूत सुविधा, औषधांची टंचाई किंवा तांत्रिक अडचणींमुळे रुग्णांना त्रास होत असल्याचे समोर आले. या सर्व अडचणी प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे आश्वासन सभापतींनी दिले.

बैठकी दरम्यान सभापतींनी उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी आरोग्य सेवकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय आणि स्थानिक पातळीवरील समस्या जाणून घेतल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर सकारात्मक मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही देत सभापतींनी सर्वांना अधिक तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले.

महापालिकेची आरोग्य यंत्रणा अधिक गतीमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी स्थायी समिती सभापतींनी प्रशासनाला कडक निर्देश दिले. त्यात प्रामुख्याने पालिका दवाखान्यांमध्ये अत्यावश्यक औषधांचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. दवाखान्यांच्या इमारती आणि वैद्यकीय उपकरणांची तातडीने दुरुस्ती करावी. प्रत्येक आरोग्य केंद्राच्या परिसरात आणि अंतर्गत भागात उत्कृष्ट स्वच्छता राखण्यात यावी. तसेच वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासन यांच्यात कामाचा योग्य समन्वय असावा, या निर्देशांचा समावेश होता.

*नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा संकल्प*
“शहरातील प्रत्येक नागरिकाला, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना पालिकेच्या माध्यमातून मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश आहे,” असे प्रतिपादन सभापतींनी बैठकीच्या शेवटी केले. आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सर्व सदस्य, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिठ्ठे, पालिकेच्या विविध दवाखाण्यांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल