मंदिरात का गेला म्हणत मारहाण ; सहा जणांविरुध्द अट्रॉसिटीसह विविध गुन्हा दाखल
नांदेड/ प्रतिनिधी
मंदिरात दर्शनासाठी का गेलास म्हणत एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुध्द उमरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरी तालुक्यातील मौजे शिरुर येथील रहिवासी तथा मिस्त्री प्रकाश माधव टिकेकर ४३ हे व त्यांची मुलगी आसेगावातील मारुती मंदिरात दि. ५ सप्टेंबर रोजी दर्शनासाठी गेले होते. मंदिरात दर्शन घेवून ते खाली उतरत असताना शिरुरमधील बाळू लक्ष्मण मामंडे याने त्यांचा हात धरुन जातीवाचक शिविगाळ करीत तू आमच्या मंदिरात कसे काय गेलास म्हणत खाली ओढत आणले आणि बाळू व त्याचे सहकारी गोविंद पिराजी मामंडे, विठ्ठल महाजन दाताळकर, माधव किशन खतगावे, साईनाथ बापुराव जाधव व अन्य एक अशा सहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. आपण हिंदू मांतग आहेत ते माहित असूनही आरोपींनी जातीवाचक शिविगाळ करीत लाथाबुक्क्या घातल्या. त्यामुळे आपण पळून गेलो व जीव वाचविला, अशी फिर्याद टिकेकर यांनी दिली. त्यावरुन पोलिसांनी उमरी पोलिस ठाण्यात उपरोक्त सहा आरोपींविरुध्द दि. ११ सप्टेंबर रोजी गुरनं २९२/२५, अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील करीत आहेत.











