ममता विविधकर यांच्या वारसदारांचा शोध; 15 दिवसांत संपर्क न केल्यास नोकरीचा दावा संपुष्टात
नांदेड, दि. 9 जून :
किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील ममता रेखा विविधकर यांच्या खूनप्रकरणी त्यांच्या पात्र वारसदारांना शासनाच्या विशेष योजनेअंतर्गत शासकीय अथवा निमशासकीय नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध असून, संबंधित वारसदारांचा शोध घेण्यासाठी समाज कल्याण विभागाने आवाहन केले आहे.
ममता रेखा विविधकर यांच्या खूनाची नोंद किनवट पोलीस ठाण्यात गु.रं.नं. 137/2024, दि. 28 मे 2024 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमांतर्गत करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र. 214, दि. 20 नोव्हेंबर 2025 नुसार अशा प्रकरणांमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय अथवा निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने समाज कल्याण विभागाने मयत महिलेच्या वारसदारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विभागातील कर्मचाऱ्यांनी मारेगाव खालचे येथे प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली असता, वारसदार राज्याबाहेर वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. मात्र ते नेमके कुठे आणि कोणत्या राज्यात राहतात, याबाबत गावातील सरपंच, पोलीस पाटील व नागरिकांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.
समाज कल्याण विभागाने मयत महिलेचे वारसदार, रक्ताचे नातेवाईक किंवा त्यांचा संपर्क असलेल्या व्यक्तींनी आवश्यक नातेसंबंधाची कागदपत्रे घेऊन पुढील 15 दिवसांच्या आत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. निर्धारित मुदतीत संपर्क न झाल्यास शासकीय नोकरीसंदर्भातील दावा संपुष्टात येऊ शकतो, असे समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे










