कंधार तालुक्यातील पुर नुकसानग्रस्त गावांची
पालकमंत्र्यासह आ.चिखलीकरांंनी केली पाहणी
नांदेड/प्रतिनिधी-गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटीसदृष्य मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद कंधार-लोहा मतदारसंघात झाली आहे. दोन्ही तालुक्यातील सर्वच मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कंधार तालुक्यातील अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा घातला होता. पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे व आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे.नांदेड जिल्ह्यात सवार्र्धिक विक्रमी पावसाची नोंद कंधार-लोहा तालुक्यात झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी पावसाच्या तडाख्यातून कंधार तालुक्यातील परिस्थिती सावरण्यापूर्वीच पुन्हा दुसर्यांदा ढगफुटीचा तडाखा कंधार तालुक्यातील गावांना बसला आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा घातला होता. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून जाण्याची सर्वाधिक नोंदही कंधार तालुक्यात झाली आहे.
दुसर्यांदा पुराच्या पाण्याचा तडाका बसलेल्या गावांची पाहणी करण्यासाठी भर पावसात कंधार-लोहाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी गावकर्यांच्या मदतीला धावून गेले. गावातील लोकांना पुराच्या पाण्यापासून सुरक्षितस्थळी जाण्याचे आवाहन केले. गेली दोन दिवस मतदारसंघातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देवून लोकांना शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पुरग्रस्त भागाची पाहणी करीत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.चिखलीकर यांना फोन करुन मतदारसंघातील पुरपरिस्थितीचा आढावा घेतला. पुराचा सामना करण्यासाठी जी मदत लागेल ती देण्यास शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आ.चिखलीकर यांना सांगितले.
जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. नांदेड जिल्ह्यातील पुरपरिस्थिती नियंत्रणासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे शुक्रवारी सायंकाळी नांदेड शहरात दाखल झाले. जिल्हा प्रशासनाकडून पुरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शहरातील पुरग्रस्त भागांना भेटी दिल्या. रात्री अर्धापूर येथील पुरग्रस्तांच्या नुकसानीची पाहणी केली. शनिवारी सकाळी पालकमंत्री सावे हे नायगांव व कंधार तालुक्यातील भुकमारी,लाडका, हळदा, काटकळंबा, कौठा, गुंडा, शिराढोण, उस्मानगर भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन नुकसान भरपाई शासनाकडून तातडीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ.चिखलीकर पालकमंत्र्यासमवेत होते.
लोहा तालुक्यात शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी सकाळी 3 वा. पासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे सर्वच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लोहा नगरपरिषद हद्दीतील सिद्धार्थनगर, इंदिरानगर, साईगोल्डन सिटी व कलालपेठ या भागात जवळपास 80 घरांमध्ये पाणी गेले होते. घरातील 35 ते 40 रहिवाशांना स्थानिक नागरीकांच्या मदतीने महसूल, पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले. त्यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तात्पुरत्या निवाराची व्यवस्था केली. तसेच साधारणतः 400 लोकांच्या जेवणाची तात्काळ व्यवस्था केली. तसेच लोहा तालुक्यातील 56 मयत जनावरे, 157 घरपडीचे पंचनामे व शेतपीक नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत, अशी माहिती तहसिलदार लोहा यांनी दिली आहे.











