स्वतंत्र दिनानिमित्ताने काढण्यात आलेल्या प्रतिबंध आदेशाला किराची टोपली दाखवत महसूल कर्मचारी संघटनेने केले आंदोलन
नांदेड – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे केले उल्लंघन
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी आणि समन्वय समितीकडून आज सोमवार दि.११ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता उल्लंघन करत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात असून न्याय हक्कासाठी उपोषणे, धरणे आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे पोलीस प्रशासन आता जोरदार निदर्शने करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का ? असा संतप्त सवालही केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, जिल्हा परिषद अशा अनेक शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वजारोहण केले जाते. त्यामुळे या राष्ट्रीय सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कुठलाही अडथळा निर्माण होवू नये यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दि. १० ते १६ ऑगस्ट दरम्यानच्या
कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ते महावीर चौक मार्गावरील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुठल्याही कारणावरून या परिसरात धरणे आंदोलन, उपोषणे किंवा निदर्शने करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच वजिराबाद पोलिसांकडून सर्वसामान्य लोकांना नोटीसा बजावून जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन
किंवा उपोषण करण्यास मनाई केली आहे. परंतु राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, नगर परिषद-नगर पंचायत कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने चेतना दिनानिमित्त सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार आणि सरचिटणीस शाम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आल्यानंतर प्रशासनातील एका अधिकाऱ्याने त्याठिकाणी धाव घेऊन लागू असलेल्या जमावबंदी आणि प्रतिबंधात्मक आदेशाची माहिती देऊन त्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु आंदोलक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून काहीवेळ आपले निदर्शन आंदोलन केले. त्यानंतर या आंदोलनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण, धरणे आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करण्याची तत्परता दाखविणारे पोलीस प्रशासन आता या आंदोलक महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का ? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात आहे.











