महानगरपालिकेत शीख धर्मियांसाठी ‘आनंद विवाह नोंदणी नियम २०२०’ ची अंमलबजावणी
नांदेड,२८ जुलै :- महाराष्ट्र शासनाच्या २३ एप्रिल २०२० रोजीच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या ‘महाराष्ट्र आनंद विवाह नोंदणी नियम, २०२०’ च्या अनुषंगाने *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या पुढाकारातून महानगरपालिकेत आता *शीख धर्मीयांसाठी* आनंद विवाह नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शीख नागरिकांना त्यांच्या विवाह नोंदणीसाठी सुलभ आणि कायदेशीर मार्ग उपलब्ध होणार आहे.
आनंद विवाह अधिनियम, १९०९ अंतर्गत महाराष्ट्रात आनंद विवाह नोंदणी नियम, २०२० ची अंमलबजावणी करणे आणि शीख धर्मीयांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी विवाह निबंधकांची नियुक्ती करणे आवश्यक होते. यासंदर्भात महानगरपालिकेने *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या पुढाकारातून तसेच अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नियंत्रणात महापालिकेने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली आहे.वजिराबाद क्षेत्रातील शीख धर्मीयांची संख्या लक्षणीय असल्याने, शीख धर्मीयांना सोयीचे व्हावे व विवाह नोंदणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी, क्षेत्रीय कार्यालय क्र. ०४, वझीराबाद येथील ‘प्रभाग अधिकारी तथा क्षेत्रीय अधिकारी’ यांची ‘विवाह निबंधक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे शीख समाजाला विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र व सुलभ व्यवस्था उपलब्ध झाली असून, त्यांना आता आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर महानगरपालिकेतर्फे शीख समाजातील नागरिकांना आनंद विवाह अधिनियमा अंतर्गत विवाह प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे.
महानगरपालिका प्रशासन शीख समाजाच्या हितासाठी कटिबद्ध असून, या नियमांच्या अंमलबजावणीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शीख समाजातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. महापालिकेत या विवाह नोंदणी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, वैद्यकीय अधिकारी हनुमंत रिट्ठे व आरोग्य विभागाचे कार्यालय अधिक्षक सतीश कंठाळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.











