चौकशी करा : अन्यथा उपोषणाचा इशारा – तातेराव वाकोडे पाटील
नांदेड – जात वैधता प्रमाणपत्र समितीचा ताबा ‘कंत्राटी’ कारभाराने घेतला असून आर्थिक वजनाशिवाय येथे फाईल हालत नाही, या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे हदगाव तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील यांनी केली आहे.
नांदेडच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीचा ताबा एका कंत्राटी कर्मचाऱ्याने घेतला आहे. पात्र असलेल्या प्रस्तावांची फाईल हा कर्मचारी अडवून ठेवत आहे. प्रस्तावात काही उणिवा नसतील तरी त्यातील कागदपत्रे गहाळ करून तो प्रस्ताव अडवीत असल्याने विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. नमस्कार चौकातील एका हॉटेलात बोलावून आर्थिक हित साधल्याशिवाय हा कर्मचारी प्रस्तावाची फाईल पुढे सरकवत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा तत्काळ समाप्त करून त्याच्यावर कारवाई करावी, याशिवाय जिल्हा जात वैधता समितीच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून सर्वसंबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वाकोडे पाटील यांनी केली आहे. अन्यथा दि.१५ मे नंतर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.








