Samyaknews

*नांदेडच्या सिंचन प्रकल्पांना गती देण्याची खा. अशोकराव चव्हाणांची मागणी

*नांदेडच्या सिंचन प्रकल्पांना गती देण्याची खा. अशोकराव चव्हाणांची मागणी*

नांदेड  दि. २२ सप्टेंबर २०२६:

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत, माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला आणि प्रलंबित कामांना गती देण्याची मागणी केली.

या बैठकीत प्रामुख्याने बाभळी बंधाऱ्याचे पाणी पोचमपाड प्रकल्पाद्वारे समुद्रात वाहून जाणे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बाभळी बंधाऱ्याचा अपेक्षित लाभ न मिळणे आणि याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, बाभळी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादन व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याशिवाय, भोकर विधानसभा मतदारसंघातील अंतिम टप्प्यात असलेल्या रेणापूर-सुधा प्रकल्प आणि पिंपळढव प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण विष्णुपरी प्रकल्पातील पंप हाऊससाठी नवीन पंप खरेदी करण्याची आग्रही मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी मांडली. विष्णुपुरी प्रकल्पात पाणी उपलब्ध असताना नादुरुस्त पंपहाऊसमुळे अनेकदा पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होतात, याकडे त्यांनी जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तूर्तास आवश्यक ती दुरुस्ती करून जुने पंप कार्यान्वित ठेवण्याचे आणि कालमर्यादा ओलांडलेले पंप बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. तसेच, अप्पर पैनगंगा प्रकल्पातून खरीप हंगामातील पिकांसाठी तातडीने एक आवर्तन सोडण्याचीही मागणी खा. चव्हाण यांनी यावेळी केली. त्याबाबत कालवा सल्लागार समितीत चर्चा करून निर्णय घेण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या.

या बैठकीला नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विधानपरिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top