डॉ. संजय कदम यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष पदी निवड
नांदेड (प्रतिनिधी)
आधार हॉस्पिटल, नांदेडचे मुख्य प्रवर्तक, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ तथा मार्गदर्शक डॉ. संजय साहेबराव कदम यांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) अध्यक्षपदी निवड झाल्याने नांदेडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल नांदेडसह मराठवाड्यातील वैद्यकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद ही राज्यातील वैद्यकीय व्यवसायाच्या नोंदणी, व्यावसायिक आचारसंहिता आणि संबंधित नियमनाची महत्त्वाची वैधानिक संस्था आहे. २०२६ मधील परिषद निवडणुकीत डॉ. संजय कदम यांनी उल्लेखनीय यश मिळवत परिषदेत स्थान मिळवले होते. त्यांना ६,९०१ मते मिळाली होती.
आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून नांदेडच्या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. कदम यांच्या अध्यक्षपदी निवडीमुळे नांदेडला राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेच्या नेतृत्वात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नव्या रचनेत, नऊ निवडून आलेले सदस्य, पाच शासननियुक्त सदस्य आणि चार पदसिद्ध सदस्यांचा समावेश आहे.
डॉ. संजय कदम यांची अध्यक्षपदी झालेली निवड हा नांदेडसाठी अभिमानाचा क्षण असून, त्यांच्या मार्गदर्शनातून वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा त्यांच्या मिळो, अशा शब्दांत सहकाऱ्यांनी, मित्रपरिवाराने आणि शुभेच्छुकांनी अभिनंदन केले. डॉ. कदम यांच्या या निवडीबद्दल आधार हॉस्पिटल परिवारासह नांदेडकरांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा !
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीचा मराठवाड्याला पहिल्यांदाच बहुमान
डॉ. संजय साहेबराव कदम यांच्या रूपाने महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवडीमुळे मराठवाड्यातील डॉक्टरची पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे हा बहुमान संपूर्ण मराठवाड्यातील डॉक्टरांसाठी तसेच मराठवाडावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. डॉ. संजय कदम यांनी आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपण डॉक्टरांच्या तसेच रुग्णांच्या विविध समस्यांवर व प्रश्नांवर सकारात्मकदृष्ट्या काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली