Samyaknews

जन्म-मृत्यू दाखला आता कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयातून मिळणार!

नांदेडकरांसाठी महानगरपालिकेचा मोठा दिलासा; जन्म-मृत्यू दाखला आता कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयातून मिळणार!

नांदेड,दि.२४ सप्टेंबर:

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मनपा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. आता नागरिकांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र दाखला मिळवण्यासाठी केवळ संबंधित भागातील क्षेत्रिय कार्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. आता महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालय क्र.१ ते ६ तसेच मनपा मुख्यालयातील अविरत विभागातून हे प्रमाणपत्र नागरिकांना प्राप्त करता येणार आहे.

मनपा हद्दीतील कोणत्याही खाजगी अथवा शासकीय दवाखान्यात, रुग्णालयात किंवा रुग्णालयाबाहेर जन्म अथवा मृत्यू झाला असल्यास, त्याची रीतसर नोंदणी झाल्यानंतर अधिकृत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिक पालिकेच्या सर्व ६ क्षेत्रिय कार्यालयांपैकी कोणत्याही ठिकाणी किंवा मुख्य कार्यालयात जाऊ शकतात. नागरिक शहरातील कोणत्याही भागात राहत असले तरी आपल्या नजीकच्या पालिका कार्यालयातून या सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी विकेंद्रीकरण केले असले तरी तांत्रिक कारणांमुळे काही सेवा केवळ मुख्य कार्यालयातच मर्यादित राहतील. सन २०१७ पूर्वीचे जुने जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढायचे असल्यास, पूर्वी काढलेल्या प्रमाणपत्रांमध्ये क्यूआर कोड असलेले प्रमाणपत्र प्राप्त करावयाचे असल्यास किंवा यापूर्वीच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची दुसरी प्रत मिळवायची असल्यास, ही सर्व कामे केवळ महानगरपालिका मुख्यालयातील अविरत विभागातूनच केली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या सीआरएस प्रणालीमध्ये एकच युजर आयडी ठेवण्यात आला असल्यामुळे, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर क्यूआर कोड प्रमाणपत्र निर्गमित होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

*मनपा आयुक्तांचे आवाहन*

महानगरपालिका प्रशासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुधारित आणि सुलभ सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी केले आहे. या निर्णयामुळे नागरिकांची वेळेची आणि श्रमाची मोठी बचत होणार असून प्रशासकीय कामात अधिक गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top