देगलूर पक्ष निरीक्षकपदी मुन्ना अब्बास
प्रतिनिधी नांदेड – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटनात्मक तयारीस गती दिली असून, देगलूर तालुक्यात पक्ष निरीक्षकपदाची धुरा काँग्रेसचे कोषाध्यक्ष, माजी नगरसेवक मुन्ना अब्बास हुसैन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. खा. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली. त्यानंतर देगलूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेलंगणा विधानसभेच्या आदिलाबाद निवडणुकीदरम्यान मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली होती. त्या अनुभवाचा उपयोग आता देगलूर तालुक्यातील निवडणूक मोहिमेत होणार आहे. देगलूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आगामी निवडणुकीत पक्षाला विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुन्ना अब्बास हुसैन यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक बळकट होणार, असा विश्वास जिल्हा काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केला आहे.











