Home / सामाजिक / धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना ११५ वा पुरस्कार जाहीर

धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना ११५ वा पुरस्कार जाहीर

धर्मभूषण दिलीप ठाकूर यांना ११५ वा पुरस्कार जाहीर

नांदेड दि. १२ ऑगस्ट
सामाजिक क्षेत्रात गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना ‘सामाजिक आयकॉन पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सान्वी जेठवाणी यांनी दिली. ॲड. दिलीप ठाकूर यांना यापूर्वी देश-विदेशातून ११४ पुरस्कार प्राप्त झाले असून, हा त्यांचा विक्रमी ११५वा पुरस्कार ठरणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रा. लक्ष्मी पुरणशेटीवार, प्रा. ओमप्रकाश दरक यांच्यासह अनेक हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या ॲड. दिलीप ठाकूर यांनी गेल्या २३ वर्षांत २५ लाखांहून अधिक जेवणाचे डबे गरजूंना वितरित केले आहेत. रस्त्यावर आयुष्य कंठणाऱ्या, बेसहारा, असहाय, दुर्बल व मानसिक संतुलन गमावलेल्या व्यक्तींसाठी गेल्या ८१ महिन्यांपासून ‘कायापालट’ उपक्रम राबविला जात आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी अशा व्यक्तींना एकत्र करून त्यांची केस-दाढी कटिंग, स्वच्छ पाण्याने अंघोळ, नवीन कपडे आणि १०० रुपयांचे बक्षीस देऊन त्यांना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या सात वर्षांत हिवाळ्यात सलग ४० रात्री रस्त्यावर झोपणाऱ्या बेघर नागरिकांना १४ हजारांहून अधिक उबदार चादरी, तर ‘कृपाछत्र’ उपक्रमातून पावसाळ्यात १४ हजारांहून अधिक छत्र्या वितरित करण्यात आल्या आहेत. यावर्षीही २०२६ छत्र्या वाटपाचा उपक्रम सुरू आहे. ‘चरण सेवा’ उपक्रमांतर्गत उन्हाळ्यात नंगेपाय चालणाऱ्या गरजू नागरिकांना १४ हजार चप्पलांचे वितरण करण्यात आले आहे.

नांदेड शहरात अन्न वाया जाऊ नये आणि कोणीही उपाशी राहू नये, या उद्देशाने सहा वर्षांपूर्वी ‘भाऊचा मानवता फ्रिज’ सुरू करण्यात आला. या फ्रिजमध्ये दररोज किमान ४० ते १२० जेवणाचे डबे ठेवले जातात आणि गरजू नागरिक त्याचा लाभ घेतात. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ॲड. ठाकूर यांचे योगदान आहे. सत्यगणपती, औंढा नागनाथ, श्रीक्षेत्र माहूर, रत्नेश्वरी आदी ठिकाणी पदयात्रांचे आयोजन करून त्यांनी धर्मासोबतच आरोग्यविषयक जनजागृती केली आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर गेल्या २६ वर्षांपासून दरवर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शेकडो ज्येष्ठ नागरिकांना अमरनाथ यात्रेचा अनुभव घेता आला आहे. तसेच गेल्या २५ वर्षांपासून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘गोदावरी गंगा पूजा’ आयोजित केली जाते, ज्यामध्ये दरवर्षी हजारो महिला सहभागी होतात.

गेल्या ३६ वर्षांपासून एसटी कर्मचारी गणेश मंडळाला दरवर्षी गणेशमूर्ती देण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली आहे. नांदेडमध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विविध क्रीडा स्पर्धा, निबंध व वक्तृत्व स्पर्धा अशा ९० हून अधिक उपक्रमांचे दरवर्षी आयोजन केले जाते. शालेय साहित्य वाटप, आरोग्य तपासणी शिबिरे आणि मोफत औषध वाटपाचे कार्य गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. या विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत ११४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, आता ‘सामाजिक आयकॉन पुरस्कार’ हा त्यांचा ११५वा पुरस्कार ठरणार आहे.

दरम्यान, सप्तरंग सेवाभावी संस्था व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव-२०२६’ दि. १४ ते १६ ऑगस्टदरम्यान कुसुम सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या तीन दिवसीय महोत्सवात राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धांसह शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, लावणी, उपशास्त्रीय नृत्य, गायन व वादनाचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय तृतीयपंथी सशक्तीकरण चर्चासत्र, जनजागृती व रोजगार मेळावा तसेच तिन्ही दिवस भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कला, साहित्य, आरोग्य, समाजसेवा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या ११५व्या पुरस्कार सोहळ्यास त्यांच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अमरनाथ यात्री संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल