Home / Uncategorized / दहा जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन; ‘जिंकू किंवा मरू’च्या भूमिकेत ज्येष्ठ नागरिक — डॉ. हंसराज वैद्य

दहा जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन; ‘जिंकू किंवा मरू’च्या भूमिकेत ज्येष्ठ नागरिक — डॉ. हंसराज वैद्य

“ज्येष्ठांच्या अश्रूंना सरकारची साथ कधी?”
दहा जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन; ‘जिंकू किंवा मरू’च्या भूमिकेत ज्येष्ठ नागरिक — डॉ. हंसराज वैद्य

नांदेड, दि. 29 जून (प्रतिनिधी):
“आयुष्यभर कष्ट करून समाज उभारणारे ज्येष्ठ नागरिक आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहेत. महागाई, आजारपण, उपेक्षा आणि शासनाची असंवेदनशीलता यामुळे त्यांचे जीवन अक्षरशः असह्य झाले आहे,” अशी तीव्र भावना व्यक्त करत ज्येष्ठ नागरिकांचे नेते डॉ. हंसराज वैद्य यांनी राज्य सरकारवर गंभीर टीका केली आहे. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या दहा जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर किमान पाच हजार ज्येष्ठ नागरिक बेमुदत धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
डॉ. वैद्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक, मानसिक आणि सामाजिक संकटांच्या गर्तेत सापडले आहेत. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणारे हेच ज्येष्ठ आता घरात “नकोसे” झाल्याची वेदनादायी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. दोन वेळचे जेवण, औषधोपचार आणि चहासाठीही अनेकांना इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. वाढती महागाई, घटती शारीरिक क्षमता आणि दुर्लक्षित जीवन यामुळे त्यांचे जगणेच असह्य झाले आहे.
ते पुढे म्हणाले की, शासनाने ‘ज्येष्ठ नागरिक सुविधा देणे विधानसभा विधेयक १५ जुलै २०२५’ संदर्भात राज्यपत्र असाधारण क्रमांक ८७ मध्ये आश्वासन दिले असून त्यासाठी विविध माध्यमांचे तब्बल ३३ पुरावेही शासनाला सादर करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सरकार पूर्णपणे उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. “शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, इतकीच आमची मागणी आहे. पण शासनाचा दृष्टिकोन अत्यंत असंवेदनशील असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
डॉ. हंसराज वैद्य यांनी इतर राज्यांचे उदाहरण देत महाराष्ट्र सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, गोवा, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन ते चार हजार रुपयांपर्यंत मानधन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तामिळनाडूमध्येही मुख्यमंत्री विजय छत्रपती यांच्या मंत्रिमंडळाने तीन हजार रुपयांच्या मानधनाची घोषणा केल्याचा उल्लेख त्यांनी केला. मात्र महाराष्ट्रात, सरसकट नको पण फक्त पात्र, विस्थापित, गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, आदिवासी, निराश्रीत,शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार,विधवा, दिव्यांग आणि उपेक्षित ज्येष्ठ नागरिकांनाही कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “आता आमच्यासमोर ‘पुढे विहीर आणि मागे आड’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. सन्मानाने जगता येत नसेल तर मृत्यूच बरा,” अशी हृदयद्रावक भावना व्यक्त करत अनेक ज्येष्ठ नागरिक अमरण उपोषण आणि अन्न-पाणी त्याग करण्याच्या मानसिकतेत पोहोचल्याचे डॉ. हंसराज वैद्य यांनी सांगितले.
येत्या मंत्रिमंडळ बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्यास दहा जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करण्यात येणार असून “जिंकू किंवा मरू” या निर्धाराने हजारो ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनादरम्यान एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे काही बरे वाईट तथा मृत्यू झाल्यास त्याची संपूर्ण नैतिक जबाबदारी शासनावर राहील, असा गंभीर इशाराही त्यांनी शासनाला दिला आहे. शासनाने आता ज्येष्ठ नागरिकांचा अंत पाहू नये. त्वरित निर्णय घ्यावा. या सुसंस्कृत, समृद्ध,पुरोगामी, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठ नागरिकांना या वयात त्यांना आझाद मैदानावर जाण्याची वेळ येऊ देऊ नये अशी कळकळीची विनंती त्यांनी शासनास केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल