२८ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता रोको
नांदेड (प्रतिनिधी) –
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (नांदेड-लातूर) + वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या महामार्गावर विविध ठिकाणी रास्ता रोको करुन काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांच्या वतीने देण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (नांदेड-लातूर) वरील विष्णुपुरी येथील पुलाची संरक्षक भिंत – कोसळल्याची अत्यंत गंभीर घटना घडली आहे. सदर काम अद्याप दोषदायित्व व निवारण कालावधी अंतर्गत असताना ही संरचना भिंत कोसळल्यामुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. ही घटना अत्यंत धोकादायक असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ही घटना घडली नसती किंवा त्यावेळी वाहनांची वर्दळ असती तर मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
या पुलाचे काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीविरुद्ध निष्काळजीपणा, निकृष्ट दर्जाचे बांधकाम व सार्वजनिक जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, संबंधित कामाचे पर्यवेक्षण करणारे अभियंते, सल्लागार व जबाबदार अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर व हलगर्जीपणा केल्याबद्दल प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ वरील सर्व पूल, संरक्षक भिंती व इतर संरचनांचे स्वतंत्र तज्ज्ञ संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, सदर पुलाचे तसेच संबंधित कामात वापरण्यात आलेल्या काँक्रीट, स्टील व इतर बांधकाम साहित्याचे मटेरियल टेस्टिंग करण्यात यावे,
कामामध्ये आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार किंवा संगनमत झाले आहे का, याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात यावे, चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीला नवीन शामकीय कामे देण्यास स्थगिती देण्यात यावी व आवश्यक ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी, चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा तसेच दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, या महामार्गाचे काम करणाऱ्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन हे कंत्राट काढून घ्यावे तसेच या कंपनीला काळ्या यादीत टाकावे या मागण्यांची पूर्तता येत्या ७दिवसांत पूर्ण न झाल्यास दि. २८ जुलै २०२६ रोजी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने या महामार्गावर विविध ठिकाणी रास्तारोको करुन काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे यांनी दिला आहे.










