१४ मंडळातील सोयाबीन उत्पादकांना ८० कोटींचा प्रलंबित पीकविमा लवकरच!: आ. श्रीजया चव्हाण
नांदेड, दि. २६ जुलै २०२६:
गतवर्षीच्या खरीप हंगामासाठी मंजूर झालेली मात्र, अद्याप प्रलंबित असलेल्या जिल्ह्याच्या १४ मंडळांची सुमारे ८० कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार असल्याची माहिती भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक, म्हणजेच सुमारे ९६२ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर करण्यात आला होता. जिल्ह्यातील एकूण ९३ मंडळांपैकी ७९ मंडळांमध्ये सुमारे ८८२ कोटी रुपयांची विमा भरपाई याआधीच वितरित करण्यात आली होती. परंतु, भोकर मतदारसंघातील बारड मंडळासह १४ महसुली मंडळांमध्ये सुमारे ८० कोटी रुपयांची विमा रक्कम मिळणे बाकी होती. राज्य सरकारने या १४ मंडळांमध्ये विमा भरपाई मिळण्याबाबतची आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण केली आहे. त्यामुळे साधारणतः येत्या आठवड्यात ही प्रलंबित रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यासाठी आमदार श्रीजया चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा-महायुती सरकारचे आभार मानले आहेत.











