पीएम-स्वनिधी योजनेला मिळाली मुदतवाढ
नांदेड – केंद्र शासनाने नुकताच पंतप्रधान स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी (पीएम-स्वनिधी) या योजनेचा कर्ज कालावधी ३१ डिसेंबर २०२४ वरून वाढवून आता ३१ मार्च २०३० पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नांदेड शहरातील अनेक फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांना अत्यल्प व्याजदरासह इतरही अनेक सुविधा सह कर्ज सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या योजनेत अनेक सुधारणा करून पहिल्या टप्प्यातील कर्ज मर्यादा १०,००० वरून १५,००० रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा २०,००० वरून २५,००० रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील कर्ज मर्यादा पहिल्याप्रमाणेच म्हणजेच ५०,००० रुपये आहे. याशिवाय योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि वेळेवर पहिले व दुसरे कर्ज परतफेड करणाऱ्या फेरीवाल्यांना यूपीआय-लिंक्ड रूपे क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार असून त्याद्वारे अचानक उद्भवणाऱ्या व्यावसायिक गरजांसाठी तत्काळ आर्थिक मदत मिळू शकेल. योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना डिजिटल व्यवहारांवर १,६०० रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यामुळे त्यांना डिजिटल पद्धतीने व्यवसाय करायला प्रोत्साहन मिळेल. याशिवाय, फेरीवाल्यांना उद्योजकता, आर्थिक साक्षरता, डिजिटल कौशल्ये आणि मार्केटिंग यांसारख्या बाबींवर विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून शहरातील स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या साहाय्याने स्वच्छता व अन्नसुरक्षा प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे फेरीवाल्यांच्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करून त्यांना शासनाच्या इतरही योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या संदर्भात या कार्यक्रमांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.
सर्व पात्र लाभार्थ्यांनी पीएम-स्वनिधी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे व फेरीवाल्यांनी सामाजिक आर्थिक सर्वेक्षणातून शासनाच्या इतरही योजना चा लाभ घ्यावा व बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज प्रकरणे मंजूर करून वितरित करावे यासाठी शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नांदेड शहरात ‘ लोक कल्याण मेळावा ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फेरीवाले, हातगाडीधारक व छोटे व्यावसायिक यांनी शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा. व आपल्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती करावी असे आवाहन मा.आयुक्त तथा प्रशासक, मा.अतिरिक्त आयुक्त, व मा. उपायुक्त (प्रशासन) यांच्या वतीने करण्यात आले आहे.











