नांदेड जिल्ह्याच्या विकासकामांसाठी खा. अशोकराव चव्हाण व आ. श्रीजया चव्हाण यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नांदेड, दि. १९ जुलै २०२५:

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आ. श्रीजया चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील अनेक विकास कामासंदर्भात चर्चा केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी सर्व कामांची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सदर विषय मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईस्थित ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत खा.अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे, शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन होत असलेल्या शेतकऱ्यांनी सूचवलेले पर्याय शासनाने जाणून घेणे, नांदेड येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ५०० खाटांच्या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देणे, शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी संपादित होणाऱ्या धरणांच्या लाभक्षेत्रातील जमिनींना बागायतीच्या दराने मावेजा देणे, नांदेड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादित करणे, मुंबई-नांदेड व नांदेड-मुंबई थेट विमानसेवेसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल एक किंवा टर्मिनल दोन वर स्लॉट उपलब्ध करून देणे, नांदेड येथे विभागीय क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे व तिथे इनडोअर स्टेडियमची उभारणी करणे, भोकर येथे आदिवासी मुला-मुलींच्या शासकीय वस्तीगृहाची इमारत बांधण्यासाठी जमीन हस्तांतरण करणे, भोकर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांचे पुतळे उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आदी विषय मांडले.
आ. श्रीजया चव्हाण यांनी प्रामुख्याने खुजडा, ता. मुदखेड येथे केळी टिश्यू कल्चर सेंटर स्थापनेच्या प्रस्तावाला मंजुरी देणे, उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर धरणाच्या कालव्यांची वहन क्षमता पुन:स्थापित करणे, नांदेड शहरासाठी पोलीस आयुक्तालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देणे नांदेड पोलिसांना राबवलेल्या ‘मिशन निर्भया’ची संपूर्ण महाराष्ट्रात अंमलबजावणी करणे, भोकर विधानसभा मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामांना व पाणंद रस्त्यांना मंजुरी देणे, जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, डेस्क-बेंचेस, सांडपाण्याच्या योग्य नियोजनासह मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, वॉटर कुलर्स व फिल्टर्ससाठी निधीची तरतूद करणे आदी मागण्या मांडल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकासकामांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश दिल्याबद्दल खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल