Samyaknews

100 दिवस कार्यालयीन सुधारणा; जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सन्मान

नांदेड दि. 7 मे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व कार्यालयांना 100 दिवसांचा कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याने चांगले कार्य करून विभागात अव्वल रहात नावलौकिक मिळवलेला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शंभर दिवसाच्या सुधारणा कार्यक्रमात विविध सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वोत्तम कामगिरी बजावत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला. या कामगिरीबाबत आज मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्यांच्या उपस्थितीत गुणगौरव सोहळयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही दिवसात कार्यालयाचे रूप पालटले आहे. ई-फायलिंग पासून तर नागरिकांना तातडीने प्रतिसाद देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आली आहे . याशिवाय या कार्यालयातील अंतर्गत स्वच्छता व नीटनेटकेपणा यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घातले आहे .याची नोंद गेल्या महिन्यात तपासणी करता आलेल्या तटस्थ पथकाने देखील घेतली होती. विशेष म्हणजे विभागात हा पुरस्कार नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे. शंभर दिवसांच्या उपक्रमात एक टीम बनून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कामाला हा पुरस्कार मिळाला आहे.
जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात आहे.
मंत्रालयात मंत्रिमंडळ कक्षात झालेल्या या पुरस्काराच्या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच विविध विभागाचे मान्यवर उपस्थित होते. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात 9 विभागातील प्रथम क्रमांक आलेल्या कार्यालयांनी सादरीकरण केले. यावेळी गुणानुक्रमे सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पहिल्या 5 क्रमांकाने आलेल्या सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्वोत्तम जिल्हाधिकारी, सर्वोत्तम पोलीस अधिक्षक, सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त, सर्वोत्तम पोलीस आयुक्त, सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम आयुक्त, संचालक यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
हा कार्यक्रम नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड कार्यालयास पुरस्कार मिळाल्याबाबत व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना हा सन्मान प्राप्त झाल्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी टाळया वाजवून आनंद व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top