Home / गुन्हा / नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच; हिमायतनगरात राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच; हिमायतनगरात राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला

नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच; हिमायतनगरात राजकीय वैमनस्यातून जीवघेणा हल्ला

नांदेड दि. ९ एप्रिल
नांदेड जिल्ह्यात अवघ्या आठवडाभरात 70 तासांच्या कालावधीत पाच हत्याकांड घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, हिमायतनगर येथे आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. राजकीय वैमनस्यातून दोन गटांमध्ये भर आठवडी बाजाराच्या दिवशीच धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना तालुका हिमायतनगर येथील बाजारपेठेतील उमर चौकात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद अचानक उग्र रूप धारण करत दोन गट आमनेसामने आले. यावेळी तलवारी, चाकू यांसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करत एकमेकांवर हल्ला करण्यात आला.
या घटनेत शेख शाकीर, शेख रईस आणि शेख कलीम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. जखमींपैकी शेख रईस व शेख कलीम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील विष्णुपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर शेख शाकीर यांच्यावर हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हातावर शस्त्राचे टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक 15 चे काँग्रेस उमेदवार व नगरसेवक शेख इलियास यांच्यासह शेख अफरोज, शेख फिरोज, शेख इमरान, शेख इजाज, शेख जावेद, शेख मेहमूद तहारी यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

भर बाजारपेठेत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे.
सदर घटनेमुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल