महाराष्ट्र अनुसूचित जमाती विकासाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा आदिवासी कोळी महादेव समाजाची मागणी
नांदेड दि. 7 –
आज जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास महाराष्ट्र अनुचित जमाती प्रकरणाच्या मागणीचे निवेदन आदिवासी कोळी महादेव मराठवाडा विभागाच्या वतीने सादर करण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या मागील अनेक दशकांतील जनगणना, राजकीय प्रतिनिधित्व, शासकीय आर्थिक तरतूद व प्रत्यक्ष खर्च, शिक्षण, शिष्यवृत्ती, आश्रमशाळा, वसतिगृह, रोजगार, जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र तसेच न्यायालयीन परिणाम याबाबत अधिकृत व पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी, हा या मागणीचा मुख्य उद्देश आहे.
विशेषतः अनुसूचित जमातींच्या विविध घटकांची जनगणनेतील लोकसंख्या, त्यानुसार शासनाच्या योजनांमध्ये झालेली तरतूद व प्रत्यक्ष लाभार्थी याबाबत जमातनिहाय व जिल्हानिहाय अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रक्रियेत निर्माण होणार्या अडचणी, त्याविरुद्ध झालेल्या न्यायालयीन प्रकरणांचे परिणाम आणि त्या प्रक्रियेमुळे शिक्षण, रोजगार, शिष्यवृत्ती, वसतिगृह किंवा इतर शासकीय लाभांवर परिणाम झाल्याच्या तक्रारींचाही अधिकृत आकडेवारीच्या आधारे वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी आहे.
आज सादर केलेल्या निवेदनावर महाराष्ट्र शासनाने 15 दिवसांच्या आत श्वेतपत्रिका तयार करण्याची अधिकृत प्रक्रिया सुरु करुन त्याबाबत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शासानाकडून या मागणीवर ठोस व वेळबद्ध कार्यवाही सुरू न झाल्यास, आवश्यक प्रशासनिक परवानगी/पूर्वसूचना व लागू कायद्याचे पालन करून दि. 24 सप्टेंबर 2026 रोजी नांदेड येथे शांततामय, अहिंसक व घटनात्मक सत्याग्रह धरणे आंदोलन करण्यात येईल.हे अभियान कोणत्याही व्यक्ती, अधिकारी, राजकीय पक्ष, जात किंवा धर्माविरुद्ध नसून पारदर्शकता, सामाजिक न्याय, उत्तरदायित्व आणि अनुसूचित जमातीच्या घटनात्मक हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीची सार्वजनिक हिताची मागणी आहे.
जनगणना ते प्रत्यक्ष लाभ संपूर्ण अधिकृत माहिती जनतेसमोर आणा आणि महाराष्ट्र अनुसूचित जमाती विकासाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा आदी मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी आदिवासी कोळी महादेव मराठवाडा विभागाचे अध्यक्ष नागनाथ घिसेवाड, व्यंकटराव मुदिराज, शशिकांत भुसेवाड, राजकुमार गादगे, आनंदा रेजितवाड, विठ्ठलराव पंजेवाड, माधवराव रेडेवाड, दादाराव कोठेवाड, विश्वनाथ चंदलवाड, राजू डोबुलवाड, जगजीवन सुद्धेवाड, नागनाथ जंगेपल्लेवाड, शंकर तम्मनवाड, राजू पिंगलवाड, प्रभाकर केंगल, प्रकाश अंबेराय आदी जमात बांधवांची उपस्थिती होती.







