जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सहयोग सेवाभावी संस्था व इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण
नांदेड, दि. ५ जून :
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सहयोग सेवाभावी संस्था आणि इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने “झाडे लावा, झाडे जगवा” या सामाजिक संदेशावर आधारित भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करणे, विद्यार्थ्यांमध्ये वृक्षांप्रती आत्मीयता निर्माण करणे आणि हरित भविष्यासाठी सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव आणि नांदेड भाजपा दक्षिणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विशद केले. आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी सांगितले की, “वृक्ष हे केवळ निसर्गाचे अलंकार नसून मानवी जीवनाचे आधारस्तंभ आहेत. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आजचा युवक हा देशाचा भविष्यकाळ आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी युवकांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास हरित आणि समृद्ध भारताचे स्वप्न साकार होऊ शकते.”
या कार्यक्रमास डॉ. नवघरे (प्राचार्य, इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी), डॉ. एस. बी. जाधव, श्री. पवन सागरुळे, कु. खान, कु. भोसले, सौ. गजेवार, कु. पालिमकर, सौ. निलकंठे तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) समन्वयक श्री. राज कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच श्री. शिवानंद बारसे (संचालक, TCS iON Digital Zone), डॉ. अग्रवाल (प्राचार्य, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी), डॉ. भार्गवी (इंदिरा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी), डॉ. गझाला खान (संचालक, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस) तसेच श्री. विक्रम ढोणे (प्राचार्य, इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल) संतोष पाटील जानापुरीकर यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवून पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमास पाठिंबा दर्शविला. कार्यक्रमादरम्यान विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला. यावेळी सर्वांनी पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीसाठी योगदान देण्याची सामूहिक शपथ घेतली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
“एक झाड – एक जीवन” या संकल्पनेला बळ देत पर्यावरण संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज असल्याचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.










