Home / राजकारण / निलंग्यात काँग्रेस नगरसेवकांकडून नगराध्यक्षांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट

निलंग्यात काँग्रेस नगरसेवकांकडून नगराध्यक्षांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट

निलंग्यात काँग्रेस नगरसेवकांकडून नगराध्यक्षांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट…

निलंगा, दि.२७

नगरपरिषद निलंगा येथे एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, नगराध्यक्षांच्या दालनात देशातील महान महापुरुषांच्या प्रतिमा नसल्याचे उघड झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. ज्या महापुरुषांच्या विचारांवर समाज उभा आहे आणि ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देत समाजाला नवी दिशा दिली, त्यांनाच सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान न देणे ही केवळ दुर्लक्षाची बाब नसून त्यांच्या कार्याचा व विचारांचा अवमान असल्याची तीव्र भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर निलंगा काँग्रेसच्या नगरसेवकांनी पुढाकार घेत नगराध्यक्षांना महापुरुषांच्या प्रतिमा भेट दिल्या व त्या तात्काळ दालनात लावण्याची मागणी केली. हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून जनतेच्या भावना आणि वाढत्या संतापाचा स्पष्ट इशारा असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या लातूर महिला जिल्हाध्यक्षा आयुष्यमती मंजु निंबाळकर यांनी थेट नगराध्यक्षांच्या दालनात जाऊन जाब विचारत प्रशासनाला कठोर शब्दांत धारेवर धरले होते. त्यांनी संतप्त स्वरात स्पष्ट केले की, “महापुरुषांचा सन्मान हा केवळ परंपरा नसून आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. त्यांच्या विचारांमुळेच आपण आज या स्थितीत आहोत. अशा महापुरुषांना दालनात स्थान न देणे म्हणजे त्यांच्या संघर्षाचा आणि बलिदानाचा अपमान होय.”त्यांच्या या भूमिकेमुळे वातावरण अधिकच तापले असून, उपस्थित नागरिकांनीही या मुद्द्यावर तीव्र भावना व्यक्त केल्या. “महापुरुषांच्या विचारांशिवाय प्रशासन चालू शकते का?” असा थेट सवाल उपस्थित करत अनेकांनी नगराध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सामाजिक व राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, हा विषय आता केवळ एका दालनापुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहराच्या अस्मितेशी जोडला गेला आहे. महापुरुषांचा सन्मान राखणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधीची नैतिक जबाबदारी असताना, अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत खेदजनक असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
निलंगा नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी तसेच भविष्यात अशा प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही, याची खात्री द्यावी, अशी तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे.
महापुरुषांचा सन्मान हा केवळ भिंतीवरील प्रतिमांपुरता मर्यादित नसून तो विचार आणि कृतीतूनही प्रतिबिंबित झाला पाहिजे, हीच जनतेची अपेक्षा आहे.
या वेळी नगरसेवक अजित नाईकवाडे, सिराज देशमुख,डॉ. गजेंद्र तरंगे, इस्माईल मणियार, सौ. विजया वांजरवाडे, सौ. सरोजा भोसले, सौ. शिवगंगा पेठकर, सौ. राधिका पेठकर, स्वाती सूर्यवंशी, तुषार सोमवंशी आदी काँग्रेस नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल