नांदेडात होणार ‘गोदागौरव’ मराठी साहित्य संमेलन
नांदेड –
नांदेड ही संत परंपरेने समृद्ध, सांस्कृतिक वैभवाने नटलेली भूमी! याच नांदेड नगरीत येत्या दि. १४ व १५ ऑक्टोबर रोजी मराठी साहित्यप्रेमींसाठी एक साहित्यिक व वैचारिक मेजवानी नांदेड जिल्ह्यातील श्रोत्यांना मिळणार आहे.
मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूर आणि अभिनव भारत शिक्षण संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलन अनुदान योजनेअंतर्गत गोदागौरव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन संत नामदेव साहित्य नगरी, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, येथे हे साहित्य संमेलन होत आहे.
या संमेलनाचे अध्यक्षपदी नांदेड मनपाच्या माजी शिक्षणाधिकारी आणि ज्येष्ठ लेखिका श्रीमती आशाताई पैठणे त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे नांदेडच्या शैक्षणिक चळवळीतून व साहित्यविश्वातून स्वागत होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संमेलनाला संवेदनशील दृष्टी, शैक्षणिक अधिष्ठान आणि मातृशक्तीचा सन्मान लाभणार आहे. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आणि स्त्रीशक्तीला दिलेली नवी दिशा हा या अध्यक्षपदाचा खरा गौरव ठरला आहे.
संमेलनाचे उद्घान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तसेच संत साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून आ. जितेश अंतापूरकर हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास डॉ. त्र्यंबक दापकेकर (स्वागताध्यक्ष), डॉ. उपेंद्र कुलकर्णी, संतोष कडगे, डॉ. संतुक हंबर्डे, बालासाहेब पांडे, डॉ. मार्तंड कुलकर्णी आणि राजेश महाराज देगलूरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडी पूजनाने होणार आहें. सचखंड गुरुद्वारातून प्रारंभ होणारी ही दिंडी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात येऊन विसावेल. * धर्मग्रंथांच्या पूजनासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी, डॉ. सदानंद मोरे, भन्ते विनयबोधीजी, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर आणि योगीराज महाराज गोसावी हे संतविभूती उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या य संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, काव्यवाचन आणि चर्चासत्रांचा समृद्ध मेळा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
सांस्कृतिक चेतनेचे प्रतिबिंब
‘गोदागौरव’ मराठी साहित्य संमेलन हे नांदेडच्या सांस्कृतिक चेतनेचे प्रतिबिंब ठरणार असून, संत परंपरेच्या पवित्र भूमीतून नव्या साहित्यिक विचारांना प्रेरणा देणारा एक नवा इतिहास रचणार आहे. रसिक वाचक, विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी, संशोधक आणि नागरिकांना या दोन दिवसांच्या साहित्य सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











