Samyaknews

कंधार येथील जिल्हा उप रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कंधार येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासह विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण आ. प्रतापराव चिखलीकर यांची माहिती

 

नांदेड  दि. १८ नोव्हेंबर २६

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार या २० नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात कंधार येथील विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार असून, श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेलाही त्या संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे २० हजार नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यावर विशेष प्रेम होते. त्यांच्या पुढाकारातून या भागातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला होता. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वातून होत असल्याचे आमदार चिखलीकर यांनी सांगितले.

कंधार येथे १०० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले असून, महाराष्ट्रातील मॉडेल रुग्णालय म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने येथे विविध आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रुग्णालयाचे लोकार्पण सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते होणार आहे.

याशिवाय कंधार नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या शांतिदूत गोविंदराव चिखलीकर उद्यानाचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. या उद्यानाच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. येथे मुलांसाठी खेळण्याची साधने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याची व्यवस्था तसेच अन्य सुविधांची निर्मिती करण्यात आली आहे.

कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय कामकाजाला गती मिळावी, यासाठी दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचेही उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सर्व विकासकामांच्या लोकार्पणानंतर श्री शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर जाहीर सभा होणार असून, उपमुख्यमंत्री पवार यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी किमान २० हजार नागरिक उपस्थित राहतील, असा विश्वास आमदार चिखलीकर यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री मेघना बोर्डीकर आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोरेगावकर, प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी, प्रवीण पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, जिल्हाध्यक्ष रावणगावकर, माजी आमदार मोहना हंबर्डे, महानगर कार्याध्यक्ष माधव पावडे, शिरीष गोरठेकर, डॉ. उत्तम सोनकांबळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top