कष्टकऱ्यांचे दुःख अधोरेखित करणारे साहित्य निर्माण व्हावे : आ. प्रतापराव पाटील चिखलीकर
लोह्यात मसापच्या तिसऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाला उदंड प्रतिसाद
लोहा : मराठवाड्यासह महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाच्या झळा जाणवत आहेत. या परिस्थितीत शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांना जगण्याचे बळ देणारे कष्टकऱ्यांची दुःख अधोरेखित करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असे मत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि डी. के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठलराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय खासदार भाई डॉ. केशवराव धोंडगे साहित्यनगरीतील कैवल्य विचारपीठावर हा सोहळा पार पडला.
यावेळी आ. आनंदराव बोंढारकर, देविदास फुलारी, शंकर वाडेवाले, डॉ. जगदीश कदम, डॉ. विजय माने, शंतनू डोईफोडे , दत्ता क्षीरसागर , माधव क्षीरसागर , दिगंबर क्षीरसागर, प्राचार्य अशोक गवते पाटील, स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ अजय क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. साहित्यिकांनी विद्यार्थ्यांच्या आणि सामान्यांच्या मनातील नैराश्य दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या पाठीशी आपण कायम राहू, अशी ग्वाहीही आ. चिखलीकर यांनी दिली. सूत्रसंचालन राम तरटे यांनी केले.
प्रा. डॉ. शंकर विभुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्रात प्रा. स्वाती कान्हेगावकर, वीरभद्र मिरेवाड, राम तरटे आणि डॉ. विभुते यांनी कथा सादर केल्या. जगन शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ येथील कवींनी कविता सादर केल्या. प्राचार्य अशोक गवते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला.
संमेलनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषद आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या ‘शेतीकडून उद्योगाकडे’ या विषयावरील डॉ. पृथ्वीराज तौर आणि दिगंबर कदम यांनी घेतलेल्या मुलाखतीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान, संमेलनात संकलित करण्यात आलेला निधी लोहा तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
साहित्यिकांनी सत्तेला जाब विचारावा : डॉ. विठ्ठल कदम
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदना शासनदरबारी मांडण्याचे काम साहित्यिकांनी करावे. विद्यार्थ्यांनी साहित्यवाचनातून जगण्याची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डॉ. विठ्ठल कदम यांनी केले.
मसापला स्वतंत्र कार्यालयाची अपेक्षा : फुलारी
मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना नांदेड येथे 83 वर्षापूर्वी झाली परंतु नांदेडमध्ये या शाखेला स्वतःचे कार्यालय नाही . त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेला स्वतंत्र कार्यालयासाठी जागा आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा देविदास फुलारी यांनी व्यक्त केली