Samyaknews

कोठा भागातील अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

कोठा भागातील अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

नांदेड,दि.०६ ऑक्टोंबर :

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध सुरू असलेली धडक मोहीम आज अधिक तीव्र करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी, कौठा भागातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

जुना कौठा भागातील गट क्र.०३ मधील प्लॉट क्र.०१ वर मालमत्ताधारक *मनोजकुमार मधुसुदन सिंघ* यांनी महापालिकेकडून मंजूर करून घेतलेल्या नकाशाच्या पूर्णपणे विरुद्ध जाऊन अनधिकृत बांधकाम केले होते. या बांधकामामुळे केवळ नियमांचे उल्लंघन झाले नव्हते, तर त्यांनी थेट रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीचा रस्ता अडवला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना आणि रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

या गंभीर अतिक्रमणाची दखल घेत सिडको क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी संबंधित मालमत्ताधारकाला महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३ आणि ५४ अन्वये यापूर्वीच कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमण न काढल्याने, महापालिकेने दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम २६० अन्वये अंतिम नोटीस बजावून हे अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधित मालमत्ताधारकाने या नोटिसीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत मुदतीत अतिक्रमण काढले नाही.

मालमत्ताधारकाने स्वतःहून अतिक्रमण न काढल्यामुळे अखेर दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने थेट घटनास्थळी धाव घेतली. *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक निलाभ रोहन, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम* यांच्या मार्गदर्शनाखाली व महानगरपालिकेचे *उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांच्या नेतृत्वात आणि सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी नागनाथ पतंगे, गौतम कवडे, अतिक्रमण पथकाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने सदरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.

 

महापालिकेचा इशारा

शहरात कोणत्याही भागात मंजूर नकाशाव्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम करणे किंवा सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास देणे कायद्याने गुन्हा आहे. अशा अनधिकृत कृत्यांवर यापुढेही महापालिकेकडून कठोर गुन्हे दाखल करून अशीच तीव्र निष्कासनाची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top