ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी ‘लक्षवेधी रिकामे ताट-वाटी-तांब्या’ पदयात्रा.
नांदेड, प्रतिनिधी :
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी नांदेडमध्ये ‘ रिकामे ताट-वाटी-तांब्या ’ अनोखी लक्षवेधी पदयात्रा आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने प्रतिकात्मक अन्न-पाणी त्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, यात ‘आसमानी व सुलतानी’ संकटात होरपळत असलेली दहा हजारांहून अधिक विस्थापित, आदिवासी,निराधार,निराश्रित, गरीब, गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, विधवा तसेच परित्यक्ता माता, दिव्यांग महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती डॉ. हंसराज वैद्य यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख मागण्यां मध्ये मृत्यूपूर्वी सन्मानाने जगण्यासाठी किमान ५ हजार रुपये मासिक मानधन देण्याचा प्रश्नही अग्रक्रमाने मांडण्यात येणार आहे. शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू तसेच देशातील इतर राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक सहाय्याच्या योजना राबविल्या जात असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांनाही त्याच धर्तीवर आर्थिक आधार का मिळू नये, असा सवाल डॉ. हंसराज वैद्य यांनी उपस्थित केला आहे.
आम्हीही भारताचेच नागरिक आहोत. एक देश, एक संविधान आणि नागरिकांना समान सन्मानाचा अधिकार असताना महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय का?” असा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला विचारण्यात येणार आहे.
ही पदयात्रा सकाळी ११ वाजता तीन ते चार व्यक्तींच्या साखळीने एकमेकांना आधार देत, स्वयं शिस्तीत आणि अत्यंत शांततेने काढण्यात येणार आहे. नांदेड मधील ज्येष्ठतम् नागरिक श्री व सौ बारहाळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविल्यानंतर पदयात्रेला सुरुवात होईल. डॉ. हंसराज वैद्य, प्रभाकर कुंटुरकर, गिरीश बाराळे, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, ॲड. एम. झेड. सिद्दिकी, डॉ. पुष्पा कोकीळ, रामचंद्र कोटलवार, ज्येष्ठ पत्रकार दलितमित्र माधवराव पवार काटकळंबेकर ईपीएस 95 चे एस एन आंबेकर व त्यांचे सहकारी, मराठ वाडा विकास संघर्ष समितीचे कॉम्रेड जांबकर व त्यांचे सहकारी, पेन्शनर्स असोसिएशन चे रेड्डी व त्यांचे सहकारी आणि उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या नेतृत्वाखाली ही अनोखी पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ही अनोखी पदयात्रा कला मंदिर, डॉक्टर लेन, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, वजीराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला वळसा घालून महानगरपालिकेसमोरून ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल. तेथे विसावून प्रतिकात्मक अन्न-पाणी त्याग धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘रिकामे ताट, वाटी आणि तांब्या’ हातात घेऊन हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत.
देशभरात ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सत्कार, मिष्टान्न भोजन आणि कौतुकाचे कार्यक्रम होत असताना त्याला छेद देत उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी हा अनोखा मार्ग स्वीकारला आहे. उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडचे पदाधिकारी शासनाच्या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत तसेच सत्कार स्वीकारणार नाहीत.
शासनाकडून दिला जाणारा काजू, बदाम, खिसमिसचा फराळ, चहा, बिस्किटे, पाणी किंवा मिष्टान्न भोजनही उपहार स्वीकारले जाणार नाही. आम्ही उपाशी आहोत’ हा संदेश शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रिकाम्या ताटातून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात येणार आहे. गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या रिकाम्या ताटात प्रथम मृत्यूपूर्वी सन्मानाने जगण्यासाठी ५ हजार रुपये मासिक मानधनाचा घास टाकावा, ही मागणी करण्यात येणार आहे.* *तसेच भिक म्हणून नव्हे, तर संविधानाने दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराच्या भावनेतून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला २५ हजार रुपये देण्याची तरतूद करावी, अशी मागणीही करण्यात येणार आहे. मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर किंवा वारसदारांवर कोणताही आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे.