लंगरसाहिब रस्त्यावरील अतिक्रमणांवर महानगरपालिकेची धडक कारवाई; दोन्ही बाजूंचे रस्ते झाले मोकळे

नांदेड,०९ सप्टेंबर :
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे बुधवार दि.०९.९.२०२६ रोजी शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि भाविकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा गेट नं. १ ते गुरुद्वारा श्री लंगरसाहेब रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार आणि पोलिस प्रशासनाच्या चोख बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली असून, यामुळे या परिसराने सुटकेचा श्वास घेतला आहे.
तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथे देश-विदेशातून रोज हजारो शीख भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येत असतात. गेट नंबर १ पासून ते लंगरसाहेब गुरुद्वाराकडे जाणाऱ्या या मुख्य रस्त्यावर गेल्या काही महिन्यांत स्थानिक दुकानदार, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण केले होते. काही ठिकाणी पक्की व तात्पुरती शेड उभारल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. परिणामी, येथे येणाऱ्या भाविकांना, पादचाऱ्यांना आणि वाहतुकीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच या संदर्भात मनपा प्रशासनाकडे व उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकांच्या अनुषंगाने अतिक्रमणे त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते.या सर्व पार्श्वभूमीवर, आज सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक, जेसिबी मशीन, डंपर आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कारवाईदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत ओटे, टपऱ्या, बेकायदेशीर शेड, जाहिरात फलक आणि रस्त्यावर लावण्यात आलेल्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. काही व्यावसायिकांनी सुरुवातीला या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु मनपाच्या पथकाने कायदेशीर बाबी समजावून सांगत आणि पोलिस बळाचा वापर करून संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमण पूर्णपणे भुईसपाट केले असुन या कारवाईत एकुण १०२ अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करत तब्बल ४ ट्रक माल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरील कारवाई पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधिक्षक निलाभ रोहन व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या नेतृत्वात अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त रावण सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी राजेश जाधव, गौतम कवडे, नागनाथ पतंगे, विठ्ठल तिडके,अग्निशमन अधिकारी निलेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक उत्तम गुट्टे, अजय साखरे, वाहतुक शाखेचे रविंद्र घाडगे, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई पार पाडली.
या कारवाईमुळे गुरुद्वारा परिसरातील रस्ता आता पूर्णपणे मोकळा आणि प्रशस्त झाला असून भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी मनपाच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.
*महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन:*”
भाविकांची सुरक्षा आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे. यापुढे या रस्त्यावर पुन्हा कोणीही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील आणि कडक दंडात्मक कारवाई केली जाईल. दुकानदारांनी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन नांदेड महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.







