Samyaknews

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक

हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ‘कावड यात्रेसाठी’ जाहीर आवाहन करत सुटले आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, तेच महाशय लाळघोटेपणा करत आमदारांचे मोठे हार घालून सत्कार करत आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने संताप व्यक्त केला आहे. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कावड यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलनाने सांगितले. तसेच त्याचवेळी संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांकडून आमदारांचा हार घालून सत्कार करण्यात आल्याने या प्रकारावरही संघटनेने आक्षेप घेत तीव्र संताप व्यक्त केला.

शैक्षणिक संस्थांचा वापर कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक प्रचारासाठी होऊ नये, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केली आहे. शाळा ही विद्यार्थ्यांना ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संविधानिक मूल्यांची जडणघडण करून देणारी संस्था आहे. त्यामुळे शैक्षणिक वातावरणात धार्मिक किंवा राजकीय प्रचाराला स्थान देणे योग्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संघटनेने म्हटले आहे की, शाळा हे ज्ञानमंदिर आहे; कोणत्याही राजकीय नेत्याचे वैयक्तिक किंवा धार्मिक जनसंपर्क कार्यालय नाही. भारतीय राज्यघटनेतील तरतुदी आणि शिक्षण विभागाच्या नियमांच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक तटस्थता आणि संविधानिक मूल्यांचे पालन करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वेळेचा वापर राजकीय किंवा धार्मिक आवाहनांसाठी करण्याचा अधिकार शाळा प्रशासनाला कोणी दिला, असा सवालही संघटनेने उपस्थित केला आहे. तसेच कावड यात्रेसारख्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करताना त्यांच्या सुरक्षिततेचा आणि पालकांच्या संमतीचा विचार करण्यात आला आहे का, याबाबतही शिक्षण विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

उद्या यात्रेच्या गर्दीत किंवा प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला काही धोका निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल सम्यक विद्यार्थी आंदोलनाने केला आहे. या प्रकाराची शिक्षण विभागाने तातडीने चौकशी करून संबंधित शाळा प्रशासन आणि संस्थाचालकांची भूमिका तपासावी, तसेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेतली नाही, तर सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात येईल आणि आवश्यक असल्यास न्यायालयातही दाद मागण्यात येईल, असा इशारा संघटनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष भूषण पाईकराव यांनी दिला आहे. शाळा-महाविद्यालयांचा वापर राजकीय आणि धार्मिक उद्दिष्टांसाठी करू नका. विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!” असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे.
O

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top