Home / राजकारण / आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडला वीज पुरवठा, पाणंद रस्ते आणि पीक विम्याचा प्रश्न

आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडला वीज पुरवठा, पाणंद रस्ते आणि पीक विम्याचा प्रश्न

आ. श्रीजया चव्हाण यांनी मांडला वीज पुरवठा, पाणंद रस्ते आणि पीक विम्याचा प्रश्न

नांदेड, दि. १७ जुलै २०२६:
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भोकर विधानसभेच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मतदारसंघातील अनियमित वीजपुरवठा, पाणंद रस्त्यांची दुर्दशा, थकीत पीक विमा, एसटी बस सेवा आणि शिक्षकांच्या कमतरतेबाबत आक्रमक भूमिका घेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे केली.

रोज संध्याकाळी ७ वाजताच वीज बंद होत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. रोज एकाच गावात संध्याकाळी वीज घालवण्याऐवजी सकाळ, दुपार, संध्याकाळ असे वेळापत्रक बनवण्याची मागणी त्यांनी केली. वसंवाडी, बेलसर, बोरगडवाडी आणि माळकौठा येथील गावठाण डीपी ७ दिवसांपासून जळालेले आहेत. तसेच ईजळी, बोरगाव, कोंढा, जवळा मुरहार आणि खुजडा येथील शेतीचे डीपी २०-२५ दिवसांपासून बंद असल्याने केळी, ऊस व हळद यांसारख्या बारमाही पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्या म्हणाल्या.

२०२५ च्या खरीप हंगामातील सोयाबीन नुकसानीपोटी जिल्ह्यातील ९३ महसुली मंडळांपैकी १४ मंडळांमधील शेतकऱ्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही. यामध्ये भोकर मतदारसंघातील बारड मंडळाचाही समावेश असून, राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून उर्वरित विमा भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी आ. श्रीजया चव्हाण यांनी केली.

भोकर मतदारसंघात ऊस आणि केळीसारख्या पिकांची वाहतूक ट्रॅक्टर-ट्रॉलीने होते. सध्याच्या निकषानुसार बनवलेले पाणंद रस्ते या जड वाहतुकीमुळे पहिल्याच पावसात वाहून जातात किंवा तिथे चिखल होतो. यामुळे शासनाचा पैसा वाया जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पाणंद रस्ते करताना केवळ काळ्या मातीचा थर न वापरता मुरूम आणि डांबर टाकून मजबुतीकरण करावे व शक्य तिथे डांबरीकरण करावे, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.

चालक किंवा वाहक सुट्टीवर असल्याच्या कारणावरून अनेक गावात ५ ते १० दिवस बस सेवा बंद राहते. अनेक जि. प. शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने दोन वर्ग एकत्र बसवावे लागतात. पाथरड, निवघा खांबाळा, निवघा ईजळी, जाकापूर, थेरबन, भोकर शहर, जांभळी आणि कोल्हा या ठिकाणी असलेल्या रेल्वे अंडरब्रिजखाली पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचा मुद्दाही आ. श्रीजया चव्हाण यांनी या बैठकीत मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल