नांदेड महानगरपालिकेत महिला बालकल्याण व शिक्षण समितीच्या आढावा बैठकीत विविध योजनांचा आढावा
नांदेड, १० जुलै:
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण तसेच शिक्षण विभागाची आढावा बैठक *सभापती सदिच्छा सोनी पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक १०.०७.२०२६ रोजी पार पडली. या बैठकीत महानगरपालिका शाळांमधील शैक्षणिक सुविधा, गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक उपक्रमांसह महिला कल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस उपसभापती निरंजना लांडगे यांच्यासह अमृताबाई ठाकूर, राजश्री गोडबोले, सुलोचना काकडे, मनप्रीतकौर कुंजीवाले, नीलम यादव, अलकेसरी सुमय्या आणि संध्या देमगुंडे उपस्थित होत्या.
यावेळी महानगरपालिका शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, विविध शैक्षणिक प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत आगामी काळात महानगरपालिका शाळांमध्ये व्यापक आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. विशेषतः शाळकरी मुलींमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही (HPV – Human Papillomavirus) प्रतिबंधक लसीकरण राबविण्याबाबत नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या लसीकरणामुळे भविष्यात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होणार असल्याने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
याशिवाय महिलांच्या सक्षमीकरणासाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, त्यांची अंमलबजावणी आणि अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत त्या प्रभावीपणे पोहोचविण्या संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीस महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रीठ्ठे, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुहास सोनुले, सहाय्यक आयुक्त निलावती डावरे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, व्यवस्थापक प्रवीण मगरे, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर, शिक्षणाधिकारी प्रवीना मांदळे आणि संतोष येमेवार उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन नोडल अधिकारी चंद्रकांत कदम यांनी केले.










