सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप
बांधकामावर बांधकाम
नांदेड –
सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले डांबरी रस्ते हाताने उघडल्यानंतर बांधलेल्या इमारतीला तोडफोड करत नव्याने बांधण्यात येत आहे. हा सर्व प्रकार जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांने निवासस्थान असलेल्या परिसरात होत आहे.
आरटीआय चौकाजवळ विश्रामगृहासमोर शासकीय निवासस्थान आहेत. या परिसरात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी राहतात. त्यामुळे या भाग प्रतिष्ठीत व उच्चभ्रू वस्ती मानली जाते. या भागातील एका इमारतीचे काही दिवसांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम ‘ हायफाय ‘ करण्यात आले. रंगरंगोटी करण्यात आली. यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले.त्यानंतर अधिकाऱ्यांना निवासस्थान देण्यात आले. पण अधिकारी निवासस्थानी राहण्यास आले नाही. त्यानंतर इमारतीची तोडफोड करण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यावर पुन्हा लाखो रुपये खर्च होणार आहेत. सदर बांधकाम अधिकाऱ्यांना ‘ पसंत ‘ नव्हते म्हणे.
काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला डांबरी रस्ता हाताने उखडला जात होता. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरस झाला होता. या व्हिडिओमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे वाभाडे निघाले होते. त्यानंतर आता त्यात भर पडली आहे. इमारतीच्या बांधकामावर बांधकाम!











