कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे , ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा त्याच भागात मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. चिखली या त्यांच्या मूळ गावी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारणीसाठी आपली मालकी हक्काची दोन एकर जमीन दान देण्याचे दायित्व चिखलीकर कुटुंबीयांनी केले आहे. सौ. प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या नावे असलेल्या दोन एकर जमिनीचे दानपत्र आज संबंधित विभागाकडे सुपूर्द केले.
लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे सातत्याने तेथील जनतेच्या हितासाठी लढत राहिले आहेत . नांदेडचे खासदार झाल्यानंतर ही आपल्या भागातील नागरिकांवरिल त्यांचे लक्ष कधीही कमी झाले नव्हते. गोरगरिबांच्या अडी अडचणी भागवत असतानाच सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठीही ते सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिले आहेत . आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नामुळे लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक उप आरोग्य केंद्र मंजूर झाली होती . त्यांच्या मूळ गावी चिखली येथे ही प्राथमिक आरोग्य केंद्र त्यांनी मंजूर करून घेतले. मात्र या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीसाठी शासनाकडे जागा नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी सौ. प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या नावे असलेल्या दोन एकर जमिनीचे दानपत्र आज करून दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार जिल्हा , आरोग्य अधिकारी सौ संगीता देशमुख , दुय्यम निबंधक सुनील रहाटकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.







