७० पार ज्येष्ठ नागरिकांना १० लाखांचे आरोग्य कवच- डॉ. हंसराज वैद्य
नांदेड 25 मे:
आयुष्मान कार्ड धारकाला वर्षाला ५ लाखांपर्यंत तर ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘वय वंदना कार्ड’ मुळे प्रतिवर्षी १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य(मोफत) मिळणार आहेत. महागड्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांचा यात समावेश असल्याने ज्येष्ठ नागरिकांना हा फार मोठा दिलासा आहे. आम्ही स्वतः ही दोन्ही कार्ड काढली आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी ‘आयुष्मान कार्ड’ व ‘वय वंदना कार्ड’ काढून घ्यावे, असे आवाहन फेस्कॉम चे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य (9423138385), सचिव प्रभाकर कुंटूरकर, कोषाध्यक्ष (9604060902), गिरीश बाराळे व समस्त कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.
दोन्ही कार्ड ज्येष्ठ नागरिकांना वैद्य रुग्णालयात महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी शिबिरात नियमित सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर एसटी प्रवास सुविधा कार्ड (स्मार्ट कार्ड) दर सोमवारी ज्येष्ठ नागरिकांना सकाळी दहाच्या पुढे विनामूल्य काढून दिले जात असून, या शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टर हंसराज वैद्य यांनी सांगितले
सामान्य ‘आयुष्मान कार्ड’ धारकांना वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळत असतानाच, आता ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्य विषयक गरजा लक्षात घेऊन शासनाने विशेष तरतूद केली आहे. ‘वय वंदना कार्ड’ द्वारे ७० पार केलेल्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला प्रतिवर्षी तब्बल १० लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्याची चिंता मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
‘आयुष्मान कार्ड’ आणि ‘वय वंदना कार्ड’ या दोन्ही वेगवेगळ्या योजना सर्वसामान्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. ‘वय वंदना कार्ड’ च्या माध्यमातून हृदय शस्त्रक्रिया, बायपास, अँजिओप्लास्टी, गुडघे व सांधे प्रत्यारोपण, कर्करोग (कॅन्सर), किडनीचे आजार, मोतीबिंदू आणि मज्जा संस्थेशी निगडित गुंतागुंतीच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात. यामध्ये औषधी, तपासणी आणि रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचा खर्चही समाविष्ट आहे.
पूर्णपणे कॅशलेस आणि पेपरलेस प्रक्रिया
रुग्णालयात भरती होताना प्रमाणित रुग्णालयात एकही रुपया द्यावा लागत नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पार पडते.केवळ ‘वय वंदना कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ दाखविल्यानंतर प्रमाणित रुग्णालयाकडून उपचाराची प्रक्रिया सुरू होते. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवर ही प्रक्रिया करणे जमत नाही, त्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा ‘सेतू केंद्रात’ जाऊन आधार कार्डच्या मदतीने हे कार्ड काढून घ्यावे. सर्व ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांतील आयुष्मान कक्षातही ही सुविधा उपलब्ध आहे.











