अनधिकृत जाहिरात होर्डीगवर महापालिकेची धडक कारवाई
शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
नांदेड,२२ :- नांदेड शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शिवाजी नगर भागात महानगरपालिकेतर्फे अनधिकृत जाहिरात होर्डीग्सवर धडक कार्यवाही करुन द टेबल फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटचे हॉटेल चालक व मालक यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने मनपा हद्दीमध्ये जाहिरात फलक लावण्यासाठी एकुण ११८ ठिकाणे निश्चित केले असुन सदरील ठिकाणी जाहीरात फलकांच्या फ्रेम लावण्यात आलेल्या असुन त्या फ्रेमची साईज सुध्दा निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये महानगरपालिकेने निर्धारीत केलेले शुल्क भरुन नागरीकांना / स्वंयसेवी संस्थांना तात्पुरती जाहिरात लावता येते. परंतु शहरातील द टेबल फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंटचे हॉटेल चालक व मालक यांच्यासह बॅनर तयार करणारे व लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द विनापरवानगी जाहिरात फलक लावण्यात आल्याचे दिनांक २२.१२.२०२५ रोजी निदर्शनास आल्याने महाराष्ट्र विरुपन प्रतिबंधक कायदा १९९५ चे कलम ३ चे उल्लंघन केल्यामुळे संबंधीत हॉटलेचे चालक व मालक इतर व्यक्ती विरुध्द शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे महानगरपालिके तर्फे FIR No. ०४४९/२०२५ दिनांक २२.१२.२०२५ रोजी नोंदविण्यात आली आहे.
सदरील कारवाई मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम व उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, इमारत निरीक्षक भरत शिवपुरे व अतिक्रमण पथकाने पार पाडली आहे. शहरातील नागरीकांनी व व्यापारी वर्गाने अनधिकृत जाहिरात फलक लावुन शहर विद्रुपीकरण न करता आचारसंहिता काळात महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.











