माधव पावडे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती
नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट ) जिल्हा कार्याध्यक्षपदी युवा नेतृत्व पावडे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याहस्ते माधव पावडे यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी काही महिन्यांपूर्वीच आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता.
आ. चिखलीकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावडे यांचे जिल्हाभरात असंख्य युवा कार्यकर्ते आहेत. त्यांचे संघटनही मजबूत राहिले आहे. त्यामुळे माधव पावडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती देण्यात येत असल्याचे आ. चिखलीकर यांनी यावेळी सांगितले. नियुक्ती कार्यक्रमात माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आमदार अविनाश घाटे, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, राष्टवादी काँग्रेसचे दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, प्रदेश उपाध्यक्षा सौ. मीनलताई खतगावकर, नेताजी पालकर, प्रा. नानवटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. पावडे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेससह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.











