नांदेड – समृद्ध अनुभूती हे साहित्यिक निशा डांगे यांच्या लेखनाचे महत्त्वाचे अधिष्ठान होय. दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांचा अन्वय लावत, त्याला समष्टीचे रूप देत, भारतीय स्त्री च्या सुखदुःखाचा कॅलिडोस्कोप वाचकांच्या समोर ठेवत ही लेखिका लिहू लागलेली आहे. त्यांच्या ‘कपाळगोंदण’ या ललितलेख संग्रहात जाणीव नेणिवेच्या पातळीवर स्त्री जीवनाचा मागोवा घेतलेला आहे.असे प्रतिपादन साहित्यिक देविदास फुलारी यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ, शाखा पुसद आणि सिद्ध साहित्यिक समूहाने आयोजित केलेल्या निशा डांगे यांच्या ‘कपाळगोंदण’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या शुभहस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.
या वेळी मंचावर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, लेखिका विजया मारोतकर, कवी बापू दासरी, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे यांची उपस्थिती होती.पुसद पंचायत समिती अंतर्गत जि. प. शाळा, माळआसोली येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या लेखिका निशा डांगे नायगांवकर यांच्या ‘कपाळगोंदण’ या ललित लेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच नवीन पुसद येथील राजे उदाराम कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. अध्यक्षीय समारोप करतांना ते म्हणाले
“पु. ल. देशपांडे पासून ग्रेसपर्यंत आणि इंदिरा संतांपासून प्रतिमा इंगोले पर्यंतच्या लेखकांनी ललित लेखनाचा अवकाश समृद्ध केला आहे. यांचा आदर्श ठेवूनच लेखिका निशा डांगे हे ललित लेखन करीत आहेत म्हणून तर त्यांचा ‘कपाळगोंदण’ हा ललित लेखसंग्रह ललित लेखनाचा वस्तूपाठ आहे.”
प्रकाशन सोहळ्याचे प्रास्तविक गझलकार प्रा. रवी चापके यांनी केले. पुस्तकावर भाष्य करतांना लेखिका विजया मारोतकर म्हणाल्या,
“कपाळगोंदण’ चा केंद्रबिंदू स्त्री जीवन हाच आहे. कितीतरी अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयास असलेले नितांत वाचनीय असे हे कपाळगोंदण मनावर गोंदल्या शिवाय राहत नाही. सजीव, निर्जीव आणि सभोवताल व्यापून असलेल्या भौतिक तसेच अंतर्मनातील कितीतरी गोष्टींचा उलगडा ‘कपाळगोंदण’ वाचल्याने होतो.”
प्रमुख अतिथी गझलकार बापू दासरी म्हणाले,
“मानवी वृत्ती आणि प्रवृत्ती यांचे यथार्थ दर्शन घडवणारा तसेच जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रबळ इच्छाशक्ती देणारा संग्रह म्हणजे निशा डांगे यांचा ‘कपाळगोंदण’ ललित लेखसंग्रह!”
आपले मनोगत व्यक्त करतांना लेखिका निशा डांगे म्हणाल्या,
“माहेर आणि सासर दोन्ही कुटुंबातील चांगले संस्कार आणि माझे वाचनवेडच मला इथवर घेऊन आले आहे. स्वानुभवातून वैश्विकता साधण्याचा प्रयत्न म्हणजे कपाळगोंदण होय ”
या सोहळ्याचे सुरेख सूत्रसंचालन
गीतकार श्रीनिवास मस्के यांनी केले. तर कविता शिरभाते यांनी सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्यात महेश मोरे, रोहिणी पांडे, चंद्रकांत कदम, अंजली मुनेश्वर , प्रा उत्तम रुद्रवार, दीपक आसेगावकर तसेच परिसरातील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर,
सर्व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी ,शिक्षक वृंद, रसिक वाचक तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.