नांदेड -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ मे रोजी नांदेड शहराच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असून, माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी या माहितीचे सुतोवाच केले आहे.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून भाजप नांदेड महानगरच्या वतीने आयोजित कार्यशाळेत बोलताना खा. चव्हाण यांनी या संभाव्य दौर्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सोमवारी २६ मे रोजी नांदेडच्या भेटीवर येणार आहेत. या भेटीचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जारी झालेला नाही. मात्र, दौऱ्यामध्ये अमित शहा यांचे सार्वजनिक कार्यक्रम असतील, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच नांदेडला येणार असून, या दौऱ्याच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने पूर्वतयारीला सुरुवात केल्याचे दिसून येते आहे.
