नांदेड दि. २४ यावर्षी युपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्याचे तब्बल १२ भूमिपूत्र यशस्वी झाले आहेत. ही बाब निश्चितच आनंदाची आहे. निष्ठापूर्वक व समर्पित भावनेने काम करा. तुमचे भवितव्य निश्चित उज्ज्वल आहे. तुम्ही मोठी गगनभरारी घ्या. मात्र नांदेडला विसरू नका. जिथे कुठे नियुक्ती असेल, तिथून नांदेडच्या सार्वजनिक हितासाठी शक्य ते करण्याचा नक्की प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. चव्हाण कुटुंबियांनी पुढाकार घेऊन येथील डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल सभागृहात गुरुवारी हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, आ. श्रीजया चव्हाण, माजी आमदार व भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे आदी उपस्थित होते. यावेळी युपीएससी परीक्षेत यश मिळवणारे ओमप्रसाद अजय कंधारे,वेदांत माधवराव पाटील,शिवराज राजेश गंगावळ यांच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. एमपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेले कृष्णा अक्कमवार, नागराज शिराळे यांनाही याप्रसंगी सन्मानीत करण्यात आले.
यावेळी हितगूज साधताना खा. चव्हाण यांनी यशस्वी उमेदवारांना प्रशासनात उत्तम काम करण्याच्या अनेक टिप्स दिल्या. ते म्हणाले की, नांदेड आता एज्युकेशन हब झाले आहे. १० वी, १२ वी, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय क्षेत्रात नांदेडच्या अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले. आता केंद्रीय लोकसेवा आयोग,महाराष्ट्र लोकसेवा आयोगातही नांदेडचे विद्यार्थी यशस्वी होत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. आता तुम्ही अधिकारी होणार आहात.आपण काम करताना लोकांना तत्पर न्याय देण्याच्या अनुषंगाने काम करा. दैनंदिन कामे करताना प्रशासनात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवा. तुमचे काम हीच तुमची ओळख राहणार आहे. अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कामातून वेगळी छाप निर्माण केली आहे. नांदेडचा दर्जेदार व गतीमान विकास व्हावा यासाठी मी श्रीकर परदेशी,स्वाधीन क्षेत्रीय सारख्या अनेक चांगल्या अधिकाऱ्यांना नांदेडला आणले. त्यांना फ्री हॅन्ड दिला. त्यामुळेच त्यांना चांगले काम करता आले. श्रीकर परदेशींच्या नांदेड कॉपी मुक्त पॅटर्नची चर्चा राज्यभर झाली. अन्य जिल्ह्यातही त्याचे अनुकरण करण्यात आले. यावेळी आ. श्रीजया चव्हाण, माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी मानले. कार्यक्रमास बालाजी इबितद्दार,मारोती कंटेवाडसह विद्यार्थ्यांचे पालक व नातलगांची उपस्थिती होती.
