लोकआदालततीमध्ये महापालिकेने केली तब्बल ५.५८ कोटीची विक्रमी वसूली
नागरिकांचा प्रतिसाद पाहता ८०% सूट योजनेस २२ मार्च पर्यंत मुदतवाढ
नांदेड,१५ मार्च :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये थकबाकीदारांकडून तब्बल ५.५८ कोटी मालमत्ता कराची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेने लोक आदालतीमध्ये आपल्या थकित कराचा भरणा केल्यास शास्तीवरील रक्कमेत तब्बल ८०% टक्के सूट जाहीर केली होती, या योजनेचा लाभ घेत एकूण ३७९९ मालमत्ताधारकांनी आपल्या थकित कराचा भरणा करून पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य केले आहे.
मालमत्ता कर थकबाकीदारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत तब्बल ३७९९ मालमत्ता धारकांनी मोठ्या प्रमाणात कर भरला असून लोक अदालतीमध्ये प्रलंबित प्रकरणांवर तडजोड करून दंड आणि व्याजामध्ये नियमानुसार सवलत देण्यात आली, ज्यामुळे करदात्यांचा कल वसुलीकडे वाढल्याचे चित्र आहे.महापालिकेचा महसूल वाढवणे आणि थकित कराची वसुली करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रक्रियेत *पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, अतिरिक्त आयुक्त गिरिश कदम, कर विभागाचे उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे आणि सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
महापालिकेत १४ मार्च रोजी झालेल्या लोकअदालतीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, ८०% शास्ती (दंड) सूट योजनेला २२ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असुन शनिवार दि.१४ मार्च रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांना ऑनलाइन स्वरूपात कर भरण्यास काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असल्याकारणाने त्यांना पुनश्च संधी देण्याच्या दृष्टिकोनातून त्याचप्रमाणे कर भरण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आता ही सवलत योजना २२ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. ज्या नागरिकांचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर प्रलंबित आहे, त्यांना शास्तीमध्ये ८०% पर्यंत सूट मिळत आहे. नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेऊन आपला कर भरून कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.










