निर्मल कुमार सूर्यवंशी यांना राज्य शासनाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
नांदेड : गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ प्रकाशन नक्षत्रात भरीव असे योगदान देणाऱ्या निर्मलकुमार सूर्यवंशी यांना राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर करण्यात आला आहे.
निर्मल कुमार सूर्यवंशी हे मराठवाड्यातील नामवंत प्रकाशक असून निर्मल प्रकाशानाच्या माध्यमातून असंख्य साहित्यिकांना त्यांनी घडवले आहे. साहित्याची नितळ भावनेने सेवा केली आहे. तब्बल 850 पुस्तक त्यांनी प्रकाशित केली आहेत. कै.नरहर कुरुंदकर गुरुजी , दत्ता भगत , शेषराव मोरे , सुधाकर डोईफोडे , जगदीश कदम , रविचंद्र हडसनकार, विठ्ठल वाघ , जनार्दन वाघमारे , इंद्रजीत भालेराव अशा दिग्गज लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहे. साहित्य क्षेत्रात आणि प्रकाशन नक्षत्रात गेल्या पाच दशकाहून अधिक काळ तळपत राहिलेल्या निर्मलकुमार सूर्यवंशी यांना यापूर्वी अनेक सन्मान मिळाले आहेत. त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य सरकारने जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे . बाबा भांडे यांच्या नंतर मराठवाड्यातील हा दुसराच सन्मान आहे. मराठवाड्याच्या मातीसाठी हा सन्मान मी समर्पित करतो अशी भावना निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे. मागील पन्नास वर्षापासून केलेल्या तपस्येचे हे फळ आहे. राज्य शासनाने माझ्या कामाची दखल घेतली . त्याबद्दल राज्य शासनाचे आपण आभार मानतो असेही निर्मलकुमार यांनी सांगितले. लवकरच एका शानदार कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मिळालेल्या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगदीश कदम , इसाप प्रकाशाचे प्रकाशक दत्ता डांगे , बालकवी पंडित पाटील बेरळीकर, पत्रकार राम तरटे आदींनी सूर्यवंशी यांचे स्वागत केले.










