विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी राहुल प्रधान
नांदेड दि.- फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नांदेड येथे होवू घातलेल्या विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व राहुल एस. एम. प्रधान यांची, तर मुख्य संयोजकपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव गावंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य संघटक किशोर ढमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या वतीने मंगळवारी (दि.२०) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. श्री. ढमाले म्हणाले की, नांदेड शहर हे श्री गुरु गोविंदसिंघजी व यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या समतावादी विचारांची पुण्यनगरी आहे. शासनाच्या पैशावर चालविणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधातील महात्मा फुले यांच्या संकल्पनेतील साहित्य संमेलन आहे. गोरगरीब जनतेच्या वर्गणीतून हे संमेलन संपन्न होणार असल्याचे किशोर ढमाले यांनी सांगितले. संविधानाचे ज्येष्ठ अभ्यासक व कादंबरीकार डॉ. अनंत राऊत यांची कोषाध्यक्षपदी, नांदेड येथील रंगकर्मी डॉ. विजयकुमार माहुरे यांची मुख्य समन्वयकपदी, तर कवी डॉ. राजेंद्र गोणारकर यांची विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलनाच्या मुख्य निमंत्रकपदी निवड करण्यात आली. संमेलनाचे स्थळ, दिनांक तसेच संमेलनाध्यक्ष याबाबत लवकरच स्थानिक नियोजन समितीमार्फत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री. ढमाले यांनी सांगितले. यावेळी राहुल प्रधान, डॉ. अनंत राऊत, संतोष आगबोटे, शिवाजी गावंडे, नितीन एंगडे, प्रबुद्ध चित्ते, राहुल जोंधळे उपस्थित होते.











