वाचीत व काँग्रेस च्या उमेदवार प्रचारार्थ आज नांदेड येथे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा
नांदेड प्रतिनिधी :
नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आज दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात होत असलेल्या या सभेकडे नांदेडमधील राजकीय वर्तुळासह मतदारांचे विशेष लक्ष लागले आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षामध्ये आघाडी झाली असून, या युतीच्या प्रचाराचा शंखनाद आजच्या जाहीर सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आंबेडकरी विचारसरणीवर आधारित राजकारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचे राजकारण आणि नांदेड शहराच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे भाषण महत्त्वाचे ठरणार आहे.
ही जाहीर सभा नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जेतवन मैदानावर आयोजित करण्यात आली असून, दुपारी ४ वाजता सभा संपन्न होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, असा दावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
या सभेला नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार, तसेच युतीतील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे ही सभा केवळ प्रचारसभा न राहता, आगामी निवडणुकीतील युतीची दिशा आणि ताकद दाखवणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नांदेड शहरातील बेरोजगारी, पायाभूत सुविधांचा अभाव, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छतेचे प्रश्न, तसेच महानगरपालिकेतील कथित गैरकारभार यांसारख्या मुद्द्यांवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करतील, अशी चर्चा आहे. तसेच वंचित- काँग्रेस युतीच्या माध्यमातून महापालिकेत पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार देण्याचा संदेश या सभेतून दिला जाणार आहे.
एकूणच नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आजची जाहीर सभा निर्णायक ठरणार आहे. या सभेला नांदेड शहरातील मतदार बंधू, बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे निवडणूक समन्वयक समितीचे अविनाश भोसीकर, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, श्याम कांबळे यांनी केले आहे.











