Home / राजकारण / नांदेडमध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपकडून विश्वासघात रिपाइं (आठवले)-भाजपची नांदेडमधील युती संपुष्टात

नांदेडमध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपकडून विश्वासघात रिपाइं (आठवले)-भाजपची नांदेडमधील युती संपुष्टात

नांदेडमध्ये रिपब्लिकन पक्षाचा भाजपकडून विश्वासघात रिपाइं (आठवले)-भाजपची नांदेडमधील युती संपुष्टात

नांदेड – महायुती स्थापन झाल्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) हा पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे भाजपसोबत उभा राहिला. संसदेत असो वा गल्लीपर्यंत ना. डॉ. रामदास आठवले यांनी सातत्याने महायुतीची बाजू लावून धरली. मात्र, सत्तेचा वाटा आणि जागावाटपाची वेळ आली की रिपब्लिकन पक्षाला नेहमीच ‘ठेंगा’ दाखवला जातो, ही बाब पुन्हा एकदा नांदेडमध्ये उघड झाली आहे.

प्रचाराच्या मैदानात निळा झेंडा उपयोगात आणायचा आणि प्रत्यक्ष सत्तेच्या वाटपात मात्र रिपब्लिकन पक्षाला बाजूला सारायचे, हा दुटप्पीपणा आता लपून राहिलेला नाही. ना. डॉ. रामदास आठवले यांनी कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असे म्हणत दिलेला इशारा हा शब्दांचा खेळ नसून, तो महायुतीतील दडपलेल्या असंतोषाचा स्पष्ट पडसाद आहे.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांची अधिकृत युती असताना समन्वयाच्या नावाखाली रिपब्लिकन पक्षाने संयम दाखवला. रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक विजयदादा सोनवने, मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नांदेड (दक्षिण) जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड (उत्तर) जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर आणि नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछेडे, नांदेड महानगरअध्यक्ष अमर राजूरकर यांच्या सोबत चर्चा करून सहा जागांची स्पष्ट मागणी मांडली होती.

प्रभाग क्रमांक १ (अ) तरोडा खुर्द, ४ (अ) हनुमान गड, ७ (अ) जयभीमनगर, ८ (अ) शिवाजीनगर, १४ (अ) इतवारा आणि १९ (अ) वसरणी सिडको या जागांवर रिपब्लिकन पक्षाने दावा केला होता. चर्चेनंतर प्रभाग क्रमांक १४ (अ) इतवारा आणि प्रभाग क्रमांक २० (अ) सिडको-वाघाळा या दोन जागा देण्याचे ठरले. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने आपला खरा चेहरा दाखवला. रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना एबी फॉर्म न देता, प्रभाग क्रमांक १४ (अ) इतवारात धनंजय कमलाकर जोंधळे आणि प्रभाग क्रमांक २० (अ) सिडको-वाघाळात निरंजना राजू लांडगे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे या उमेदवारांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाशी काडीचाही संबंध नाही.

महाराष्ट्र प्रदेश संघटक विजयदादा सोनवने यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संबंधित उमेदवार रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर उभे नाहीत, त्यांना पक्षाचा एबी फॉर्मही देण्यात आलेला नाही. भाजपकडून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपा नांदेड महानगरअध्यक्ष अमर राजुरकर यांनी जाहीर केलेल्या यादीत रिपाई (आठवले) पक्षाच्या नावाखाली उमेदवारी दाखवण्याचा प्रयत्न झाला असला तरी प्रत्यक्षात त्या दोन्ही उमेदवारांचा रिपब्लिकन पक्षाशी काहीही संबंध नाही, हे आता निर्विवादपणे स्पष्ट झाले आहे. नांदेड च्या भाजपने केलेला हा प्रकार म्हणजे केवळ राजकीय डावपेच नाही, तर एका विश्वासू सहकारी पक्षाचा उघड विश्वासघात आहे. महायुती ही केवळ मतांसाठी आणि प्रचारापुरती आहे का, असा प्रश्न आता रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेलाही पडला आहे. ना. रामदास आठवले यांचा इशारा आणि कार्यकर्त्यांमधील संताप पाहता, नांदेडमधील हा प्रकार भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. नांदेड वाघाळा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष व भाजपची युती संपुष्टात आली आहे. अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश संघटक विजयदादा सोनवणे यांनी केली असून यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुखदेव चिखलीकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गौतम काळे, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल घुताडे, जिल्हा सरचिटणीस संजय भालेराव यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल