आमदार चिखलीकरांना लोह्यात धक्का ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी भाजपात
नांदेड – प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष तथा लोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कल्याण सुर्यवंशी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कल्याण सुर्यवंशी यांचा भाजप प्रवेश म्हणजे आ. चिखलीकरांना मोठा धक्का समजला जात आहे.
कल्याण सुर्यवंशी यांना मानणारा लोहा शहर व तालुक्यात मोठा वर्ग आहे. मागील अनेक दिवसांपासून आ. चिखलीकर यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. परंतु, अखेर कल्याण सुर्यवंशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व आ. चिखलीकर यांना सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला. खा. अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा रुमाल घालून त्यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, कंधार-लोहा विधानसभा मतदारसंघाचे भाजप प्रभारी एकनाथ पवार, जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती.











