प्रशासनाच्या अहवालावरील आकडेवारीवर ना. संजय राठोड संतापले
नांदेड – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने सादर केलेल्या अहवालावर बोट ठेवत ना. संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. अतिवृष्टीमुळे एकही पुर्ण घर पडले नाही, एकाही घरांमध्ये पाणी गेले नाही ? असा प्रश्न उपस्थित केला. अहवालात निरंक दाखविण्यात आले होते. ना. राठोड यांनी पुन्हा पाहणी करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली. 1017 टक्के पाऊस पडला. 66 मंडळात 3 पेक्षा अधिक वेळा अतिवृष्टी झाली. 450 जणांना स्थलांतरित केले. 26 जणांचा मृत्यू झाला असून 21 जणांच्या कुटुंबांना मदत दिली. 2291 घरांची पडझड झाली. 18 हजार कुटुंबे बाधित झाली. 6 हजार 54 एकर जमीन बाधित झाली. नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाले असून चार दिवसांत याद्या तयार होतील. दसऱ्यापुर्वी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.
एका आठवड्यात पशू धनांना आर्थिक मदत द्यावी असे आदेश ना. राठोड यांनी दिले.
आठवडाभरात मृत्यू पावलेल्या जनावरांचे प्रकरणे निकाली काढा, मदत मिळाली पाहिजे, दोन – तीन दिवस लांबविणे चुकीचे आहे, असेही ना. राठोड म्हणाले.
जिल्ह्याला 553 कोटी रुपयांचा निधी मिळाला पण तो निधी कमी आहे, पुरवणी मध्ये अधिक निधी द्या, राज्यात सर्वात जास्त अतिवृष्टी नांदेड जिल्हात झाली. त्यामुळे नांदेड जिल्हा कर्जमुक्त करावा, अशी मागणी आ. बाबुराव कदम यांनी केली.
ग्रामपंचायत सह गावांमध्ये अतिवृष्टी बाधितांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
रस्त्यांसाठी 350 कोटी रुपयांचा निधी द्यावा, स्थलांतरित लोकांना भोजन द्यावे, अशी मागणी आ. आनंद बोंढारकर यांनी केली. आजपर्यंत पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले असा आरोप आ. बाबुराव कदम यांनी केला.
खचलेल्या, बुजलेल्या विहिरींचा अहवाल पाठविण्याचे आदेश ना. राठोड यांनी दिले. यासाठी अनुदान मिळत नाही, पण त्यासाठी विशेष बाब म्हणून अनुदान मंजूर करु, असे ते म्हणाले.
शहरातील घरांमध्ये पाणी गेलेल्या घरांचे पंचनामे करून बाधितांना अनुदान द्यावे, यापूर्वीच्या बाधितांना अनुदान मिळाले नाही. हे मनपा प्रशासनाला शोभणारे नाही, शासनावर टीका झाली, अशा शब्दात आ. बोंढारकर यांनी नाराजी व्यक्त केली. एक वर्षानंतर बाधितांना अनुदान दिले, मनपा प्रशासन काय करते ? असा संताप व्यक्त केला.
घरांची पडझड झालेल्यांना आठ दिवसांत अनुदान वाटप करण्याचे निर्देश ना. राठोड यांनी दिले.
पोचमपाड धरणामुळे बॅक वॉटरचा पाण्याचा फटका बसत आहे. त्यासाठी पूर नियंत्रण रेषा ठरवावी लागेल, असे मत जिल्हाधिकारी कर्डिले यांनी मांडले.
दिवाळी पर्यंत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दसऱ्या पर्यंत शेतकऱ्यांना मदत देऊ असे आश्वासन दिले. त्यावर ना. राठोड यांनी समाधान व्यक्त केले.
पूर बाधित परिसरात अतिक्रमण झाले आहे. दरवर्षी प्रसंग उभा राहतो. अतिक्रमण हटवून तेथील लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आ. बोंढारकर यांनी केली.











