पूरग्रस्तांच्या मृत्यूप्रकरणी अभियंत्यावर गुन्हे दाखल करा
रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रावणगावकर यांची मागणी
नांदेड (प्रतिनिधी)
मुखेड तालुक्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने पाच जणांचे बळी घेतले आहेत. शेकडो जनावरे दगावली आहेत. त्यामुळे या मृत्यूला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता तिडके हे जबाबदार आहेत. पाच जणांच्या मृत्यूला आणि शेकडो पशुंच्या बळींना जबाबदार असणाऱ्या तिडके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण रावणगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दि. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पात अचानक आलेल्या पाण्याने रौद्ररूप धारण केले. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन झाले नसतांनाही धरणाची घळभरणी करण्यात आली. परिणामी रावणगाव, हसनाळ, भिंगोली आदी गावांत पुराचे पाणी शिरले. हसनाळमधील पाच जणांचा या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर शेकडो नागरिक बेघर झाले आहेत. पूर इतका भयानक होता की, नागरिकांना स्वतःचे जीवही वाचविता आले नाहीत. याच महापुराने शेकडो पशुंचाही बळी घेतला आहे. हे सर्व बळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या बेजबाबदारपणाने घेतलेले बळी आहेत. त्यामुळे पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी आणि शेकडो पशुंच्या हत्येला जबाबदार ठरणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करावेत. त्यांना तातडीने अटक करावी. सेवेतून बडतर्फ करावे; अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण रावणगावकर यांनी दिला आहे. दरम्यान, ते म्हणाले की, आ. तुषार राठोड यांच्या घरावर लवकरच तिरडी मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात येणार आहे.











