खा. रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने नांदेड पुणे वंदे भारत रेल्वे धावणार
नांदेड – मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक दृष्टीने पुणे हे अत्यंत महत्त्वाचे शहर बनले आहे. नांदेड ते पुणे आय. टी. हब शहराला अनेक आय.टी. व्यावसायिक व शैक्षणिक विद्यार्थी दररोज ये-जा करतात. सद्यस्थितीत नांदेड ते पुणे दरम्यान दिवसभरात एकही रेल्वे गाडी उपलब्ध नसल्याने प्रवाशांना प्रचंड मनः स्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नांदेड-पूणे-नांदेड वंदे भारत रेल्वे सेवा नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मार्गाने सुरू करावी, अशी मागणी खा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांच्या या मागणीला रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या डिसेंबरपर्यंत नांदेड-पुणे वंदेभारत रेल्वेसेवा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.
खा. रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, नवीन नांदेड-पूणे-नांदेड वंदे. भारत रेल्वे सेवा नांदेड, लातूर, उस्मानाबाद या मार्गे सुरु केल्यास
मराठवाड्यातील लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. हे अंतर सुमारे ५५० कि.मी. आहे. याशिवाय पणवेल-नांदेड गाडी क्र. १७६१३ या रेल्वेचा वेग वाढवण्याची आवश्यकता असून ही गाडी पनवेलहून दुपारी ४ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता नांदेड स्थानकावर पोहचते, आणि ६४६ कि.मी. अंतर इलेक्ट्रिक इंजिनने पार करते. पनवेल-कुडूवाडी स्टेशनचे ३०३ कि.मी. अंतर ६ तास २० मिनिटांत तर कुडूवाडी-नांदेडचे
३७० कि.मी. अंतर १० तास २० मिनिटांत पार करते. परिणामी ही गाडी नांदेड स्थानकावर विलंबाने पोहचत आहे. या रेल्वे गाडीचा वेग वाढविणे तांत्रिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.
लातूर रोड रेल्वे स्थानकावर इंजिन बदलणे व परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर इंजिन बदलण्याचा वेळ कमी करण्यासाठी या दोन्ही स्थानकांवर चौर्ड लाईन करणे गरजेचे आहे. याचा फायदा येथून जाणार्या १०-१२ रेल्वे गाड्यांना होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि रेल्वेची आर्थिक बचतही होईल, असेही खा. रवींद्र चव्हाण यांनी नमूद केले आहे. अहमदनगर-बिड रेल्वे लाईन सुरू झाली आहे आणि बीड-परळी-वेजनाथ रेल्वे लाईन डिसेंबर २०२५पर्यंत सुरू होईल असे आश्वासन दिल्याची रेल्वेमंत्र्यांना आठवण करून देताना खा. रवींद्र चव्हाण यांनी नांदेड-परळी वैजनाथ-बीड अहमदनगर-पूणे मार्गे नवी दिल्ली नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांची मागणी आहे. ही मागणीही मंजूर करावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे.











