नांदेड,- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने भव्य भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, 19 जून 2025 रोजी दुपारी तीन वाजता ओम गार्डन, नागार्जुन पब्लिक स्कूलसमोर, जुना कौठा, नांदेड येथे पार पडणार असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली राहणार आहेत.
या कार्यक्रमाला खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार डॉ. शिवाजी काळगे यांची उपस्थिती राहणार असून, उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आमदार तथा बाळासाहेब ठाकरे हळद-हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, आमदार भीमराव केराम, आमदार बाबुराव कदम कोहळीकर व आमदार तुषार राठोड, माजी सहाय्यक गट विकास अधिकारी बाबुराव पुजरवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
स्वागतेच्छुक म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, मंजुषा कापसे, प्रशांत थोरात, नारायण मिसाळ, अमित राठोड, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, ए. एन. भोजराज, राहुल रावसाहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, कृषी विकास अधिकारी डॉ. अनिलकुमार ऐतवडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांचा समावेश राहणार आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक रॉकस्टार राहुल साठे आणि त्यांच्या संचामार्फत प्रेरणादायी भीमगीतांचा विशेष संगीत कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत भीमजयंती साजरी होणार असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या भव्य कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयुक्त जयंती मंडळाचे अध्यक्ष रणजीत गजभारे, सचिव धनंजय गुम्मलवार, कार्याध्यक्ष राजेश जोंधळे व कोषाध्यक्ष सचिन चौदंते यांनी केले आहे.
– विजय निलंगेकर